घंटानाद करा पण आमचा नाद करु नका, महापौरांचे मनसेला प्रत्युत्तर

घंटानाद करा नाही तर आणखी कसला नाद करा. पण आमचा नाद करु नका, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. राजकीय पोळ्या भाजून घेणारे आम्ही लोकांच्या भावनेचा विचार करतो असं दाखवतात. पण त्यांचं या मागे राजकारण आहे. हे सर्वसामान्य लोकांनाही माहीत आहे, असं पेडणेकर म्हणाल्या. विरोधकांनी भावनेचा नाही लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा

    मुंबई: एकिकडे कोरोनाच्या धरतीवर राज्य शासनाने सणांवर काही निर्बंध लावले असताना, दुसरीकडे मात्र दहिहंडी साजरी करण्यासाठी आज मनसे आक्रमक झाल्याचे पाहयला मिळाले. दुपारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदे घेऊन जर काय राज्यातील मंदिरं सुरू केली नाही तर, आम्ही घंटानाद आंदोलन करू, असा इशारा राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पलटवार केला आहे. घंटानाद करा नाही तर आणखी कसला नाद करा. पण आमचा नाद करु नका, असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. राजकीय पोळ्या भाजून घेणारे आम्ही लोकांच्या भावनेचा विचार करतो असं दाखवतात. पण त्यांचं या मागे राजकारण आहे. हे सर्वसामान्य लोकांनाही माहीत आहे, असं पेडणेकर म्हणाल्या. विरोधकांनी भावनेचा नाही लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा. जेव्हा प्रादुर्भाव वाढतो तेव्हा हे सगळे बिळात जातात, असा टोलाही त्यांनी लगावला.

    यावेळी त्यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या व्हायरल व्हिडिओचा दाखला दिला. मनसेच्या एका नेत्याचा कोरोना काळातील रडतानाचा व्हिडीओ मला अनेकांनी दाखवला. तेव्हा हे रडत होते. आता हे दहिहंडीसाठी लोकांना गर्दी करण्याकरिता उकसवत आहेत. यांचं तेव्हाच वागणं खरं की आताचं वागणं खरं हे समजत नाही. मनसेच्या `त्या´ नेत्याचे अश्रू हे `मगरमच्छ के आंसू´ समजायचे का?, असा सवाल त्यांनी केला. मुंबई महापालिका तिसऱ्या लाटेसाठी सज्ज आहे. विशेषत: इमारती सील करण्याच्या मोहिमेवर आमचं लक्ष आहे. पाच माणसांना कोरोनाची लागण झालेलं आढळल्यास ती इमारत किंवा सोसायटी सील करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

    यावेळी त्यांनी मास्कशिवाय फिरणाऱ्या लोकांवर कारवाई केली नाही म्हणून मार्शल अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं. मुंबईत तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे योग्य कारवाई करा, असे आदेशच त्यांनी या मार्शलना दिले. फोनवरूनच त्यांनी या मार्शल अधिकाऱ्यांचा समाचार घेतला. मास्क न घालता फिरणारे अनेक लोक हुज्जत घालत असतात. अशा लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच हुज्जत घालून अरेरावी करणाऱ्या मार्शल विरोधात तक्रारी आल्यास अशा क्लिनअप मार्शलवरही कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक क्लिनअप मार्शलची आणि वॉर्डाची ओळख दर्शवणारा ठळक क्रमांक गणवेशावर देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनाही तक्रार करणे शक्य होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

    दरम्यान आज दिवसभर दहीहंडी सणांवर काही निर्बंध असताना मनसे आक्रमक होत दहीहंडी सण साजरा केला. सकाळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काळा चौकी येथे दहीहांडी फोडली त्यानंतर मनसे कार्यकर्ते आणि पोलीस आमने सामने आले. बाळा नांदगावकर यांनी पोलिसांनी अटक केल्याची माहिती सुद्धा समोर आली होती.