महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या हेल्पलाईन योद्ध्यांसाठी मेडिक्लेम इन्शुरन्स…

    मुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सुरू केलेल्या कोरोना हेल्पलाईनमध्ये जे पदाधिकारी व कार्यकर्ते फ्रंटलाइन वॉरियर्स आहेत, त्या सर्वांना एक लाख रुपयापर्यंतचा मेडिक्लेम इन्शुरन्स पुरवण्याचा निर्णय आज अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत जाहीर केला.

    महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, नियंत्रण कक्ष स्थापन करून राज्यभरात जिल्हानिहाय हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. रुग्णांना बेड मिळवून देणे, औषध उपलब्ध करणे, आयसीयू, व्हेंटिलेटरचे बेड मिळवून देणे अशा अनेक कामांमध्ये राज्यातील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मदत होत आहे.

    सत्यजीत तांबे काय म्हणाले ?

    “महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या कोरोना हेल्पलाईनमध्ये काम करणारे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते हे माझ्यासाठी फ्रंटलाईन योद्धे आहेत. ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना रूग्णांना व त्यांच्या नातलगांना मदत करत आहेत. सध्याच्या दुसऱ्या लाटेत मदतकार्य करताना काहीजणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे युवक काँग्रेसच्या फ्रंटलाईन योद्ध्यांना आम्ही रुपये एक लाख पर्यँतचा मेडिक्लेम विमा देणार आहोत” अशी माहिती अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली आहे. या कार्यकारिणी बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती होती. सोबतच आमदार कुणाल पाटील आणि प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

    दरम्यान युवक काँग्रेसने पूर्ण जोमाने काम करावे. महाराष्ट्र काँग्रेस युवकांमागे खंबीरपणे उभी आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसचा ‘सुपर 1000’ हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पासाठी महाराष्ट्र काँग्रेस देखील पूर्ण ताकदीनिशी युवक काँग्रेसमागे उभी असेल, असे यावेळी नाना पटोले म्हणाले. गेल्या वर्षीदेखील मागील लॉकडाऊनमध्ये युवक काँग्रेसने गरजूंना अन्नधान्य, औषधे व तात्काळ सेवा अशी विविध प्रकारे मदत केली होती. राज्यभरात युवक कॅांग्रेस कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिरातून २५ हजार रक्तपिशव्या गोळा केल्या होत्या. हे मदतकार्य करताना महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. या पार्श्वभूमीवर मेडिक्लेम देण्याचा निर्णय घेण्यात आला.