अकाली दलासोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा, दिल्लीतील बैठकीला येण्याचंही आश्वासन

अकाली दलाचे नेते प्रेम सिंह चंदू मांजरा यांनी उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांची बाजू समजावून सांगितली. शिवसेना आणि महाराष्ट्राचं सरकार हे कायमच शेतकऱ्यांच्या बाजूनं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा मुख्यमंत्री ठाकरेंनी जाहीर केलाय. शिवाय पंधरा दिवसांनी दिल्लीत येऊन चर्चा करायला तयार असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाल्याचं अकाली दलाच्या नेत्यांनी सांगितलं.

केंद्र सरकारनं कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी सध्या पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातील शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंजाबमधील अकाली दलाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केल्याची घोषणा अकाली दलाच्या नेत्यांनी केलीय.


अकाली दलाचे नेते प्रेम सिंह चंदू मांजरा यांनी उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांची बाजू समजावून सांगितली. शेती हा राज्यांचा विषय असून केंद्र सरकार त्यावर अतिक्रमण करू पाहत असल्याचं प्रेम सिंह चंदू मांजरा यांनी म्हटलंय. शिवसेना आणि महाराष्ट्राचं सरकार हे कायमच शेतकऱ्यांच्या बाजूनं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितल्याची माहिती मिळतेय.

केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असून त्या अनुषंगाने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. शेतकरी आपल्या देशाचा कणा असून त्यांच्या अडचणी व समस्यांचा विचार करणे व त्या सोडविण्यास आपण सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे असे चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, यासाठी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. इतर राज्यांतील काही शेतकरी संघटनांनीदेखील या मोर्चाला पाठिंबा दिला आहे.

सरकारसोबत शनिवारी झालेल्या वाटाघाटींम्ये काहीच तोडगा न निघाल्यामुळे शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला (मंगळवारी) भारत बंदची हाक दिली आहे. बंदच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ९ डिसेंबरला (बुधवारी) शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि सरकार यांच्यात चर्चा होणार आहे.