पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांची जाचातून सुटका; मध्यच्या मेन आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहूनच प्रवासाचा बेत आखा अन्यथा रक्षाबंधनालाही होईल विलंबच

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.४४ या वेळेत सुटणारी डाऊन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवली जाईल आणि वेळापत्रकानुसार निर्धारित स्थानकांवर थांबतील.

    मुंबई : देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यासाठी आज उपनगरीय विभागांत मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक कार्यान्वित करण्यात येणार आहे.

    माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ पर्यंत

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.४४ या वेळेत सुटणारी डाऊन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवली जाईल आणि वेळापत्रकानुसार निर्धारित स्थानकांवर थांबतील. ठाण्यापुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळविल्या जातील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने त्यांच्या गंतव्यस्थानावर येतील.

    ठाण्याहून सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२६ पर्यंत सुटणारी अप जलद सेवा मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन त्यांच्या वेळापत्रकानुसार निर्धारित स्थानकांवर थांबतील. पुढे या अप जलद सेवा माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

    हार्बर मार्ग

    पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत (नेरूळ /बेलापूर-खारकोपर मार्ग वगळता)

    पनवेल येथून सकाळी १०.४९ ते संध्याकाळी ४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ या वेळेत पनवेल/बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

    पनवेल येथून सकाळी ९.०१ ते दुपारी ३.५३ या वेळेत ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी मार्गावर ब्लॉक दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.

    ब्लॉक कालावधी दरम्यान ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर सेवा उपलब्ध असतील.

    पश्चिम रेल्वे

    पश्चिम रेल्वे मार्गावर आज कोणताही जम्बो ब्लॉक घेण्यात येणार नाही.