स्वातंत्र्याचा लढा जिवंत करणारे स्मारक ऑगस्ट क्रांती मैदानात उभारावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल राज्यात हा उत्सव सुरु होत आहे. स्वातंत्र्य चळवळीत सर्वसामान्य जनतेने जातपात, धर्म यापलिकडे जाऊन देशाप्रती भावना दाखविली. अनेकांनी कुर्बांनी पत्करली. त्यांचे हौतात्म आठवण करून भागणार नाही, तर ज्यांनी आपले आयुष्य घालवले त्यांना अभिमान वाटेल असा देश उभा करता येईल का, स्वराज्याबरोबरच सुराज्य आणू शकतो का हा विचार व्हावा.

    मुंबई : ऑगस्ट क्रांती मैदान हे एक रणमैदान होते. स्वातंत्र्य चळवळीची आठवण देणाऱ्या या मैदानाचे नुसते नुतनीकरण न करता या मैदानात स्वातंत्र्यलढा जिवंत करणारे स्मारक करावे. इतिहास जिवंत ठेवणे व तो पुढच्या पिढीपर्यंत पोचविणे हे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले आहे.

    स्वराज्याबरोबरच सुराज्याचा ही विचार व्हावा

    मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल राज्यात हा उत्सव सुरु होत आहे. स्वातंत्र्य चळवळीत सर्वसामान्य जनतेने जातपात, धर्म यापलिकडे जाऊन देशाप्रती भावना दाखविली. अनेकांनी कुर्बांनी पत्करली. त्यांचे हौतात्म आठवण करून भागणार नाही, तर ज्यांनी आपले आयुष्य घालवले त्यांना अभिमान वाटेल असा देश उभा करता येईल का, स्वराज्याबरोबरच सुराज्य आणू शकतो का हा विचार व्हावा.

    ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा शुभारंभ

    मुंबईतील आझाद क्रांती मैदानात आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई शहराचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय, बंदरे व वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख होते तर,  प्रमुख अतिथी म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख उपस्थित होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार अरविंद सावंत, महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सीताराम कुंटे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आदी यावेळी उपस्थित होते.

    क्रांती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन

    यावेळी स्वातंत्र्यसैनिक सत्यबोध नारायण सिंगीत, शहीद स्क्वाड्रन लीडर मनोहर राणे यांच्या वीर पत्नी श्रीमती माधुरी मनोहर राणे, हवालदार मधुसूदन नारायण सुर्वे तसेच प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त कु. काव्या कार्तिकेयन यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर केला. सर्वप्रथम मान्यवरांनी ऑगस्ट क्रांती स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर व्यासपीठावरील महात्मा गांधी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्प अर्पण केले. कोरोना विषयक मार्गदर्शनाचे संपूर्ण पालन करत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

    १९४२ ला गवालिया टँक मैदानातून स्वातंत्र्याची सुरूवात झाली. त्यावेळचे दृष्य कसे असेल हे आठवण्याचा प्रयत्न केला तर या मैदानाचे महत्त्व लक्षात येते. हा स्वातंत्र्याचा लढ्याचा इतिहास जिवंत ठेवणे, हे स्वातंत्र्य प्राणपणाने जपणे आणि त्याचे सुराज्यात रुपांतर करणे हे आपले कर्तव्य आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    क्रांतीकारक शहिद भगतसिंग, हुतात्मा राजगुरु, सुखदेव यांच्याबरोबरच महात्मा गांधी, लोकमान्य टिळक या स्वातंत्र्यवीरांची प्रेरणा घेऊन राज्याला पुढील काळात वाटचाल करायची आहे. आज आपण कोरोनाच्या रुपाने दुसरा लढा लढत आहोत.

    अमित देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री.

    सायकल रॅली आणि पदयात्रा

    आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने यावेळी मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या सायकल रॅलीचे व ऑगस्ट क्रांती मैदान ते मणी भवन मार्गावरील पदयात्रेचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. सायकल रॅलीत २५ व पदयात्रेत २० विद्यार्थी सहभागी झाले होते.