गांधीगिरी मार्गानं आंदोलन करणार दादर मधील व्यापारी; जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आक्रमक पवित्रा घेणार

मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे यांना लवकरच व्यापाऱ्यांचे एक शिष्टमंडळ भेटून आपल्या अडचणी व मागण्यांचे गाऱ्हाणे घालणार आहेत. तसेच जर संवैधानिक मार्गाने आंदोलन करून पल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आगामी पालिका निवडणुकीत त्याचे पडसाद सर्वांना पहायला मिळतील असा इशाराही दिला आहे.

  मुंबई : “कुणावर मेहरनजर, कुणावर जबरनजर… हे मुंबईकर वोटिंग ला दाखवतील …महाराष्ट्र सरकार…करा सहकार्य…पोट सांभाळू का निर्बन्ध सांभाळू …अस्तित्व राहिले तर सर्व निर्बन्ध सांभाळू…अच्छे सभी होते है, उनकी पेहचान बुरे वक्त मे होती है… ” अशा घोषणांचे फलक हातात घेऊन दादर येथील व्यापाऱ्यांनी आज सर्वत्र एकसमान कायद्याचे पालन व्हावे आणि शनिवार रविवारी सर्व दुकाने खुली ठेवण्याची परवानगी मिळावी, तसेच सोमवार ते शुक्रवारच्या १० ते ४ या वेळे ऐवजी १० ते ७ अशी वेळ वाढवून मिळावी यासाठी निषेध आंदोलन केले.

  मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे यांना लवकरच व्यापाऱ्यांचे एक शिष्टमंडळ भेटून आपल्या अडचणी व मागण्यांचे गाऱ्हाणे घालणार आहेत. तसेच जर संवैधानिक मार्गाने आंदोलन करून पल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आगामी पालिका निवडणुकीत त्याचे पडसाद सर्वांना पहायला मिळतील असा इशाराही दिला आहे.

  त्यापूर्वी त्यांनी निषेध मोर्चा काढून माध्यम प्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत मुंबईमधील विविध ठिकाणांपैकी काही ठिकाणी सर्रासपणे शनिवार रविवारला सुरू असलेल्या मुंबईमधील इतर ठिकाणच्या बाजारातील दुकानांची चित्रफीत माध्यम प्रतिनिधींना दाखवून नेमेपणानं आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न केला.

  दादर हे मुंबई शहरामधील मध्यमवर्गातील सर्वांना परवडणाऱ्या किफायतशीर खरेदीचे प्रमुख केंद्र असल्याने येथे नेहमीच गिऱ्हाईकांची वर्दळ पहायला मिळते. पण लॉकडाऊनच्या विविध निर्बंधांमुळे गेली दोन वर्ष सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यात दुकाने सुरू करूनही शनिवार रविवार हे महत्त्वाचे दिवस दुकाने बंद असल्याने व्यवसायाला मरगळ आली आहे. त्यामुळे या महागाईच्या काळात दुकानाचे भाडे/ हप्ते, विद्युत देयके, कर्मचाऱ्यांचा पगार, कोरोना सेफ्टीचा इतर खर्च अशा अनेक बोज्यांचा सोस व्यापारी वर्गावर असूनही दादर मधील बहुतांश व्यापारी सर्व नियमांचे पालन करताना दिसून येत आहेत. मात्र असे असताना मुंबईमधील अनेक भागांमध्ये कायद्याचे उल्लंघन होत आहे.

  आमच्या काही प्रतिनिधींना आम्ही शनिवारी मुंबई मधील विविध ठिकाणी पाठऊन तेथील परिस्थिती नेमकी काय आहे याची चित्रफीत तयार करून आणण्यास सांगितले, तेव्हा आमच्या असे निदर्शनास आहे की काही भागात कोणतेही निर्बंध पाळले जात नाहीत आणि त्यांच्यावर कोणती कार्यवाही झाल्याचेही ऐकिवात आले नाही.

  मग आमच्या भागात एखाद्या दुकानाचे अर्धेशटर उघडे दिसले तर लगेच बोंबाबोंब करणाऱ्यांनी तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या विभागात जाऊन योग्य ती कार्यवाही करून लॉकडाऊनची शिस्त पाळणाऱ्या इतर व्यापाऱ्यांना योग्य न्याय द्यावा ही विनंती आम्ही दादर व्यापारी संघाच्या वतीने करीत आहोत. तसेच सर्वत्र शनिवार रविवार दुकाने खुली ठेवण्याची परवानगी मिळावी अशी आपल्या मार्फत प्रशासनास विनंती करीत आहोत अशी माहिती दादर व्यापारी संघाचे पदाधिकारी सुनील शहा, हरिश शहा, दीपक देवरुखकर यांनी दिली.