नारायण राणेंच्या जीवाला धोका – प्रसाद लाड

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नुसतेच बसवून ठेवले आहे. ना कुठली कारवाई करत आहेत, ना कसली माहिती देत आहेत. गोळवली प्रकल्पात नारायण राणे यांना पोलिसांनी भरल्या ताटावरून जेवताना अर्धवट उठवले असेही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांनी एफआयआर केला असे सांगितले जाते, ते पोलीस स्थानकात उपस्थित नाहीत.

    संगमेश्वर – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले असून, त्यांच्या जीवाला धोका असल्याचे भाजपा नेते  प्रसाद लाड यांनी म्हटले आहे. संगमेश्वर पोलीस स्थानकाबाहेर पत्रकारांशी ते बोलत होते. आज गोळवली येथील रा.स्व. संघाच्या सेवा प्रकल्पाची पाहणी करत असताना, रत्नागिरी पोलिसांनी वॉरंट नसताना, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले. तेथून त्यांना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांना बाहेर गाडीतच बसवून ठेवले आहे. त्यांचा रक्तदाब वाढला असून त्यांना तातडीने वैद्यकीय मदतीची गरज आहे. परंतु त्यांना वैद्यकीय मदतही दिली जात नाहीये अशी माहिती प्रसाद लाड यांनी दिली आहे.

    प्रसाद लाड पुढे म्हणाले की,  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नुसतेच बसवून ठेवले आहे. ना कुठली कारवाई करत आहेत, ना कसली माहिती देत आहेत. गोळवली प्रकल्पात नारायण राणे यांना पोलिसांनी भरल्या ताटावरून जेवताना अर्धवट उठवले असेही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांनी एफआयआर केला असे सांगितले जाते, ते पोलीस स्थानकात उपस्थित नाहीत.

    पोलीस सहकार्य करत नसल्याने आमदार प्रसाद लाड पोलीस ठाण्यात उपोषणास बसले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना वॉरंटशिवाय ताब्यात घेणे बेकायदेशीर असल्याचे भाजपाचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी सांगितले. त्यामुळे पुढील जन आशीर्वाद यात्रेचे नेतृत्व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर करणार असल्याची माहिती समोर येत आहे. नारायण राणेंना अटक करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन दबाव आहे, तसेच एका मंत्र्यांचा दबाव असल्याचे एसपी यांनी म्हटले आहे, परंतू ते दबाव टाकणारे मंत्री कोण आहेत? हे पोलीस अधिकाऱ्यांनी नाव सांगण्यास नकार दिला अशी माहिती आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे.