संजय राठोड यांच्या नावापुढे काही तासातच लागणार ‘माजी मंत्री’ ही बिरुदावली

उद्धव ठाकरे यांची संजय राठोड यांनी दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. त्यात मुख्यमंत्र्यांनी राठोड यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे सांगण्यात आले आहे. 'मी काही निर्णय घेण्याअगोदर तू तुझा निर्णय घे,' असे मुख्यमंत्र्यांनी राठोडांना सांगितल्याचे समजते.

  मुंबई : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर करण्यात आलेले आरोप तसेच कोविड काळात त्यांनी केलेले नियमांचे उल्लंघन या अत्यंत अयोग्य बाबी असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे झाले आहे असे विश्वसनीयरित्या समजते. यामुळे त्यांना लवकरच राजीनामा द्यावा लागणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गेले काही दिवस ते `डेंजर झोन` मध्ये होते. मात्र विधीमंडळाचे अधिवेशन राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गाजणार असल्याने त्यांना राजीनामा देण्याचा निरोप दिल्याचे सांगण्यात आले.

  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांची संजय राठोड यांनी दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. त्यात मुख्यमंत्र्यांनी राठोड यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे सांगण्यात आले आहे. ‘मी काही निर्णय घेण्याअगोदर तू तुझा निर्णय घे,’ असे मुख्यमंत्र्यांनी राठोडांना सांगितल्याचे समजते. त्यामुळे येत्या अधिवेशनाआधी संजय राठोड राजीनामा देतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे हे त्यांच्या विश्वासू मंत्र्यांसोबत या संदर्भात पुन्हा एकदा चर्चा करणार असल्याचेही समजते. या दरम्यान राठोड स्वत:हून पायउतार होतील तर बरे असेही सांगितले जात होते. त्यामुळेच राठोड यांना पायउतार झाल्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.

  राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा आक्रमक पवित्रा

  राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आता आक्रमक भूमिका घेतली असून अधिवेशन होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे. भाजपच्या महिला मोर्चातर्फे आज राज्यभर त्यासाठी आंदोलन करण्यात आले. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राठोड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आणि या प्रकरणात पोलिस दबावाखाली असल्याचेा आरोप केला.

  या गदारोळात त्यांचे पती किशोर वाघ यांच्यावर अपसंपदा जमा केल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्याने दोन्ही बाजूंनी राजकीय वातावरण पेटले आहे. विधीमंडळाचे अधिवेशन येत्या एक मार्चपासून त्या आधीच राठोड यांना अभय मिळणार की त्यांना पदावरून जावे लागणार, याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.