कारागृहांमध्ये वर्षानुवर्षे नाहक अडकलेल्या महिला कैद्यांच्या सुटकेसाठी मिशन मुक्ता; यशोमती ठाकूर यांची घोषणा

केवळ जामिनाचे पैसे भरायला नाहीत म्हणून किंवा कायदेशीर बाबींची पूर्तता झाली नाही म्हणून अनेक महिलांना तुरुंगात खितपत पडावे लागते आहे. अशा महिलांच्या सुटकेसाठी राज्य सरकारच्यावतीने मुक्ता योजना लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर(Yashomati Thakur) यांनी दिली आहे.

  मुंबई : केवळ जामिनाचे पैसे भरायला नाहीत म्हणून किंवा कायदेशीर बाबींची पूर्तता झाली नाही म्हणून अनेक महिलांना तुरुंगात खितपत पडावे लागते आहे. अशा महिलांच्या सुटकेसाठी राज्य सरकारच्यावतीने मुक्ता योजना लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर(Yashomati Thakur) यांनी दिली आहे.

  दागिन्यांच्या एका चोरीप्रकरणी एक महिला गेल्या चार वर्षापासून तुरुंगात आहे. मात्र, सदर दागिने शेजारीच आढळून आले. तरीही केवळ ५० हजार रुपये भरण्यासाठी नाहीत म्हणून ही महिला तुरुंगात अडकून आहे., असे उदाहरण ठाकूर यांनी दिले. झोमॅटो मध्ये काम करणा-या एका महिलेला पोलिसांनी अरेरावी केल्याच्या प्रकरणात सुमारे दोन वर्ष डांबून ठेवले होते.

  या दरम्यान, सदर महिलेच्या मुलीची आणि कुटुंबाची वाताहत झाली. पण क्षुल्लक कारणावरून अडकलेल्या त्या महिलेला नुकतेच सोडविण्यात आले. अशाच पद्धतीने राज्याच्या विविध तुरूंगामध्ये नाहक खितपत पडलेल्या महिलांना कायदेशीर बाबींची पूर्तता करून कसे सोडवता येईल, यासाठी मुक्ता योजना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील विविध विभागांमधील तुरूंगात जाऊन स्वतः पाहणी करून माहिती घेणार असल्याचं एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

  मुक्ता याेजनेमुळे दिलासा मिळणार; कारागृहांचा भार कमी करणार !

  महाराष्ट्रात ९ मध्यवर्ती कारागृह आहेत. या कारागृहात महिला कैदी ठेवण्याची क्षमता ४५२ एवढी आहे. मात्र, प्रत्यक्षात ितथे ७६३ महिला कैदी ठेवण्यात आलेले आहेत. याशिवाय १६ अ दर्जाची जिल्हा कारागृह आहेत. या कारागृहांची महिला कैदी ठेवण्याची क्षमता ही ३८१ इतकी आहे. मात्र, प्रत्यक्षात या कारागृहात ६२९ महिला कैदी आहेत. ब दर्जाच्या जिल्हा कारागृहांमध्ये महिला कैदी ठेवण्याची क्षमता ही ३२१ एवढी आहे.

  मात्र, तिथे १६० कैदी आहेत. याशिवाय एक विशेष कारागृह आहे, त्याची क्षमता ही ३ महिला कैद्यांची असून प्रत्यक्षात ६ महिला कैदी तिथे ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात एकूण १५४ कारागृह आहेत, त्यांची क्षमता ही १७१९ महिला कैदी ठेवण्याची असून तिथे १ हजार ६३६ महिला कैदी ठेवण्यात आले असल्याची माहिती गृहविभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील नाहक तुरूंगात अडकलेल्या महिलांची सुटका मुक्ता योजनेंतर्गत झाल्यास या महिलांना दिलासा मिळेल आणि तुरूंगावरील भारही कमी होईल, असा विश्वासही ठाकूर यांनी व्यक्त केला.