मिठी नदी रुंदीकरणाचा प्रकल्प १६ वर्षे संथ गतीने; भाजपचा ठपका

मिठी नदीच्या किनारी असलेली अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवण्यात पालिका प्रशासनास १६ वर्षानंतरही यश आलेले नसल्यामुळे मिठी नदीचे रुंदीकरण केवळ कागदावर राहिलेले असल्याचा गंभीर आराेप भाजपाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.

  मुंबई : गेल्या २६ जुलै २००५ राेजी मुंबई झालेल्या मिठी नदीच्या महाप्रलयानंतर या नदीच्या रुंदीकरणाचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे. या कामाला १६ वर्षे पूर्ण झाली तरी हे काम संथ गतीने सुरू आहे. नदीच्या रुंदीकरणाच्या एकाही टप्प्याचे काम अजूनही पूर्ण हाेवू शकलेले नाही. हे काम अजूनही कागदावरच त्याला प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका भाजपाने ठेवला आहे.

  मिठी नदीच्या रुंदीकरणासाठी चार टप्प्यामध्ये काम विभागण्यात आले. मात्र १६ वर्षानंतरही यातील एकाही टप्प्याचे नदीच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. प्रशासनाने रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार केला; स्थायी समितीने त्यास मंजुरी दिली; प्रशासनाने कंत्राटदारास कार्यादेश दिले परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी कामच होऊ शकलेले नाही.

  मिठी नदीच्या किनारी असलेली अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटवण्यात पालिका प्रशासनास १६ वर्षानंतरही यश आलेले नसल्यामुळे मिठी नदीचे रुंदीकरण केवळ कागदावर राहिलेले असल्याचा गंभीर आराेप भाजपाचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.

  यंदाच्या पावसाळ्यात मिठी नदीने रौद्र रूप धारण केलेले होते. नदीच्या किनाऱ्या लगतच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची वेळ आली होती. पाऊस थांबल्यानंतर आणि ओहोटी असतांना सुद्धा मिठी नदी ही तुडूंब भरलेली होती. त्यामुळे पार्ले, सांताक्रुज, खार, वांद्रे आणि माहीम तसेच कुर्ला, धारावी आणि सायन या सर्व विभागातील नाले, नद्या तुडूंब भरलेल्या होत्या.

  पाण्याचा निचरा ७ ते ८ तास होऊ शकला नाही. ही बाब लक्षात घेता मिठी नदीचे रुंदीकरण तातडीने करणे आवश्यक आहे. परंतु प्रशासन याबाबत अद्यापही उदासीन आहे असे दिसते. तरी याबाबत संयुक्त बैठक घेऊन अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत कार्यवाही युध्दपातळीवर करावी अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे.

  मिठी नदीला आलेला पुर आणि त्पापासून झालेल्या नुकसानीस, वित्त आणि जीवितहानीस महापालिका आयुक्त जबाबदार असून त्याबाबत भाजपा तीव्र आंदाेलन करील असा इशारा भाजपाने पालिका आयुक्तांना देत शिवसेनेवर निशाना साधला आहे.