Mixed response in Mumbai; Chor Bazaar, Nala Bazaar, Zaveri Bazaar shops closed; Public transport started

रेल्वे, रिक्षा, टॅक्सी, बससेवा तसेच मोनो, मेट्रोसेवा सुरळीत होती. त्यामुळे चाकरमान्यांना कामाच्या ठिकाणी वेळेत व सुरक्षित पोहचता आले. मात्र, बहुतांश ठिकाणी भाजीपाला मार्केट, फुल, फळ बाजार बंद होते. दुपारनंतर दूधविक्रीही झाली नाही. तसेच काही ठिकाणी दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. शिवसेनेचा प्रभाव असलेल्या भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. विविध संघटना, व्यापारी, व्यावसायिक आदींनी बंदमध्ये सामील होऊन शेतक-यांच्या आंदोलनाला उत्स्फुर्त पाठिंबा दिला.

मुंबई : सत्ताधारी शिवसेनेसह महाविकास आघाडीने बंदला पाठिंबा दिल्यानंतर राज्यात शेतकरी आंदोलनाच्या मुंबई उपनगर तसेच महानगर भागात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद पहायला मिळाला.

मुंबई ठाण्यात जनतेने स्वत:हूनच या आंदोलनाला प्रतिसाद देत सकाळी काही काळ बंद मध्ये सहभागी होत दुकाने कार्यालये बंद ठेवल्याचे पहायला मिऴाले. तर रोजच्या पेक्षा चाकरमान्यांनी देखील कमी प्रमाणात घराबाहेर पडणे पसंत केले. सार्वजनिक वाहतूक सुरळीत सुरु होती.

भारत बंदला मुंबई ठाण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.  नेहमी पेक्षा आज बस लोकलसाठी गर्दी कमी होती.  रेल्वे, बस आणि खाजगी गाड्यांमधील प्रवासी संख्या सकाळी कमी होती. ठाणे रेल्वे स्थानक, ठाणे एस टी बस डेपो तसच ठाण्याहून खाजगी बसेसने मुंबईला जाणारे चाकरमानी आज कमी संख्येने बाहेर पडले त्यामुळे या ठिकाणांवर आज चाकरमान्यांची कमी वर्दळ पहायला मिळाली.

मुंबईसह उपनगरांमध्ये भारत बंदमुळे कमी प्रमाणात बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या होती. त्यामुळे बेस्ट आणि एनएमएमटीने रस्त्यावर कमी प्रमाणात गाड्या उतरवल्या. बंदमुळे अनेकजण घरातून बाहेर पडलेच नाहीत त्यामुळे बेस्ट आणि एनएमएमटीने आपल्या गाड्या दररोजच्या तुलनेत आज थोड्या कमी सोडल्या. मात्र, दुपारनंतर गर्दी वाढली. वसई विरार नालासोपारा शहरातही भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रिक्षा, दुकाने आज सकाळपासून बंद ठेवण्यात आली आहेत. वसई रेल्वे स्थानकाजवळ दुकाने बंद ठेवण्याची विनंती करण्यात आली होती.  त्याला चांगला प्रतिसाद  मिळाला.

रेल्वे, रिक्षा, टॅक्सी, बससेवा तसेच मोनो, मेट्रोसेवा सुरळीत होती. त्यामुळे चाकरमान्यांना कामाच्या ठिकाणी वेळेत व सुरक्षित पोहचता आले. मात्र, बहुतांश ठिकाणी भाजीपाला मार्केट, फुल, फळ बाजार बंद होते. दुपारनंतर दूधविक्रीही झाली नाही. तसेच काही ठिकाणी दुकानेही बंद ठेवण्यात आली होती. शिवसेनेचा प्रभाव असलेल्या भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. विविध संघटना, व्यापारी, व्यावसायिक आदींनी बंदमध्ये सामील होऊन शेतक-यांच्या आंदोलनाला उत्स्फुर्त पाठिंबा दिला.

दादरमधील फुल, फळ मार्केटमध्ये शुकशुकाट होता. लालबाग, काळाचौकी,  परळ, वरळी, प्रभादेवी, शिवडी, लोअरपरळ आदी शिवसेनेचा प्रभाव असलेल्या भागात बाजार, दुकाने बंद ठेवण्यात आली. पश्चिम उपनगरांत काही ठराविक ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला. पश्चिम उपनगरांतील वांद्रे, दहिसर, मालाड, बोरिवली, कांदिवली या भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. पार्ला परिसरात बाजार, दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

मुसाफिर खाना, मनीष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट बंदमध्ये सहभागी झाले होते. मुंबई शहरातील मुख्य बाजार पेठा असलेल्या दक्षिण मुंबई परिसरात बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला.  भायखला, नागपाडा,माझगाव, आग्रिपाड़ा,कुंभार वाडा, गिरगाव, मोहम्मद अली रोड, चोर बाजार, बोरी मोहल्ला, नळ बाजार, दागिना बाजार, झवेरी बाजार, डायमंड मार्केट परिसरात लोकांची नेहमी होणारी वर्दळ कमी होती. येथील बहुतांश दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवत भारत बंद ला पाठींबा दिला.

ग्रांटरोड येथील इलेक्टोनिक्स, इलेक्ट्रिक मार्केट नेहमी प्रमाणे सुरु होते. व्यवहारही सुरु होते. भावेश जैन या व्यापाऱ्याने सांगितले की आमचा शेतक-यांच्या बंदला पाठींबा आहे.  पण कोरोनाचा अनेक व्यापा-यांना फटका बसला आहे. व्यवसायही मंदीत आहेत. त्यामुळे दुकाने सुरु ठेवण्यात आली.

कृषी कायद्या विरोधात दिल्लीच्या सिमेवर हजारो शेतक-यांचे आंदोलन मागील १३ दिवसांपासून सुरु आहे. केंद्र सरकारकडून कोणताही तोडगा निघाला नसल्याने देशभरातील शेतकरी आक्रमक झाले आहे. शेतक-यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी मंगळवारी भारतबंद पुकारला.

दूध खरेदीसाठी मोठी गर्दी

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दुपारनंतर मुंबईत दुधाचे टँकर तसेच दुधाचा पुरवठा करणाऱ्या गाड्या आल्या नाही. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दुपारनंतर मुंबईत दूधाचा पुरवठा करणार नाही.  मुंबईकरांना दुपारी ११ च्या आत दूध विकत घेण्याचे आवाहन संघटनांकडून करण्यात आले होते. त्यामुळे दूध खरेदी करण्यासाठी सकाळी अनेक ठिकाणी मुंबईकरांची गर्दी झाली होती.

व्यापारी, माथाडी कामगारांचा बंदला प्रतिसाद

शेतकरी संघटनांनी जाहीर केलेल्या देशव्यापी बंदला राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पाठिंबा दिला होता. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनेही यात सहभाग नोंदवला.  माथाडी, व्यापारी शंभर टक्के सहभागी झाले होते. राज्यातील सर्वात मोठी समिती ही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या माध्यमातून मुंबई, ठाणे आणि उपनगरात शेतमालाचा पुरवठा केला जातो. या बाजारात भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, धान्य आणि मसाला मार्केट हे पाच बाजार बंद ठेवण्यात आले होते. वाहतूकदारांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने मुंबईकडे होणारी आवक झाली नाही. त्यामुळे या वस्तूंचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.

सरकारी कार्यालयात शुकशुकाट

भारतबंदमुळे मुंबईतील सरकारी कार्यालयात कामानिमित्ताने येणा-यांची वदर्ळ नव्हती. त्यामुळे अनेक कार्यालयात शुकशुकाट होता. सीएसएमटी परिसरात तसेच फोर्ट विभागातील खासगी कंपन्यांच्या कार्यालय परिसरातही नेहमीप्रमाणे वदर्ळ दिसली नाही.

पदपथही मोकळे

बंदमुळे नाक्या – नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे फेरीवाल्यांनीही आपले व्यवसाय़ बंद ठेवून घरी राहणे पसंत केले. होते. त्यामुळे पदपथांनीही मोकळा श्वास घेतला होता.

रस्त्यावरील वाहतूक तुरळक

भारत बंदमुळे व्यवसाय किंवा इतर कामानिमित्ताने घराबाहेर पडणा-या मुंबईकरांची वर्दळ कमी होती. त्यामुळे अनेक खासगी वाहने रस्त्यावर उतरली नसल्याने बहुतांश ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक तुरळक होती.

मेट्रो, मोनो सुरळीत

मुंबईतील रेल्वे, रिक्षा, टॅक्सी व बस सेवेसह मेट्रो, मोनोची वाहतूक सुरु ठेवण्यात आली होती. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेलेल्या मुंबईकरांना इच्छितस्थळी वेळेत पोहचता आले.

मुंबईत  ४५२९ पैकी ४४८६ बस रस्त्यावर

मुंबईत अजूनही सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु झालेल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांना बससेवेचा आधार आहे. भारतबंदमध्ये बससेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. एकूण ४५२९ बसेसपैकी ४४८६ बसेस रस्त्यावर धावल्या. बंदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळी ११ नंतर रेल्वे रिकाम्या

रेल्वेसाठी सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा देणा-या कर्मचा-यांची गर्दी होती. मात्र महिलांची होणारी गर्दी बंदमुळे दिसली नाही. खरेदीसाठी किंवा कामानिमित्त घराबाहेर पडणा-या बहुतांशी महिलांनी घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे ११ नंतर बहुतांशी रेल्वे रिकाम्या धावल्या.

ओला उबेर ४० टक्के बंद

एमएमआर क्षेत्रातील बहुतांशी ओला उबेर संघटनांनी भारत बंदमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे ४० टक्के ओला उबेर रस्त्यावर धावल्य़ा नाहीत. अनेक कामगारांनी बंदला पाठिंबा दिल्याचे संघटनेचे महेश जाधव यांनी सांगितले.

बँका नेहमीप्रमाणे सुरू

सरकारी, खासगी, कोऑपरेटिव बँकेचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु होती. वाहतूक सुरु असल्याने बँक कर्मचा-यांनाही वेळेत पोहचून सेवा दिली.

रुग्णालये सुरळीत

केईएम, सायन, नायर तसेच जेजे रुग्णालय, जीटी रुग्णालय, सेन्टजॉर्ज रुग्णालय, कामा ऑलब्लेस हॉस्पिटल तसेच खासगी दवाखाने, नर्सिंग होम सुरु होते. जेजे रुग्णालय अत्यावश्यक सेवेत आहे. त्यामुळे येथे सर्व वैद्यकीय विभाग, ओपीडी सुरु असून रुग्णावर उपचार केले जात आहेत. मुंबईतील सर्व सरकारी, पालिकेची व खासगी रुग्णालये नेहमीप्रमाणे सुरु होती.