रशियामध्ये अडकले राज्यातील २०० विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याची आमदार प्रकाश गजभिये यांची मागणी

मुंबई : रशियातील विविध विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेले महाराष्ट्रातील सुमारे २०० विद्यार्थी कोरोना महामारीमुळे अडकले असल्याचे समोर आले आहे.

  मुंबई : रशियातील विविध विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेले महाराष्ट्रातील सुमारे २०० विद्यार्थी कोरोना महामारीमुळे अडकले असल्याचे समोर आले आहे.  यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी विदर्भातील असून राज्याच्या इतर भागातील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. या विद्यार्थ्यांना तातडीने मॉस्को ते नागपूर विमानाने परत आणण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

नागपुर, बुलढाणा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपुर, गोंदिया व भंडारा या जिल्ह्यातील सुमारे २०० विद्यार्थी रशियामधील १५ विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. रशियामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरला असल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे राज्यातील विद्यार्थीमधे  भीतीचे वातावरण पसरले आहे.
हे विद्यार्थी दोन महिन्यांपासून भीतीच्या छायेखाली आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आमदार प्रकाश गजभिये यांच्याशी संपर्क साधला असून आपल्या मुलांना तातडीने मायदेशी आणण्याची विनंती केली आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना मॉस्को ते नागपूर विमानाने त्वरित मायदेशी आणण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
 त्याचप्रमाणे गजभिये यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दोनशे विद्यार्थ्यांची यादी दिली आहे. नागपूरमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती माझ्याकडे केली आहे. त्यानुसार मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे याबाबत मागणी केली आहे. राज्यातील इतर भागांमधील अनेक विद्यार्थी रशियात अडकले असण्याची शक्यता आहे. या विद्यार्थ्यांनाही मायदेशी आणून पालकांना दिलासा देण्यासाठी मी सरकारकडे पाठपुरावा करत आहे, असे गजभिये यांनी सांगितले.