पत्रकारांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी आमदार प्रसाद लाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अनेक पत्रकारांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. आपल्या सेवेचा भाग म्हणून त्यांना मुंबईच्या उपनगरांमधून दूरवरून प्रवास करून यावे लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी लोकलचा प्रवास महत्वाचा असतो आणि अशावेळी आणखी कोणती दुर्घटना घडण्याआधी सरकारने त्यांना लोकल प्रवासाची सोय उपलब्ध करून द्यावी.

    मुंबई:लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या सर्वच पत्रकारांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी आणि तसे परिपत्रक त्वरित काढावे, अशी विनंती भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. गुरुवार दिनांक १५ एप्रिलपासून संपूर्ण लॉकडाऊन लागू करताना ट्रेनचा प्रवास केवळ सरकारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाच उपलब्ध करून दिला असून पत्रकारांना वगळण्यात आले आहे, या पार्श्वभूमीवर लाड यांनी ही मागणी केली आहे.

    मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात लाड यांनी असे म्हटले हे की, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर यांना रेल्वेतून प्रवास करण्याची अनुमती दिली असली तरी अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या पत्रकारांना मात्र वगळण्यात आले आहे. “आपल्या धान्यात आणून देऊ इच्छितो की, पत्रकार अत्यावश्यक सेवेत येत असूनही त्यांना मात्र रेल्वे प्रवासाच्या मुभेतून वगळण्यात आले आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता पत्रकार हे फिल्डवर उतरून सर्वसामान्यांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम अविरतपणे करत असतात. कोरोनाच्या काळात ही बाब प्रकर्षाने जाणवली आहे. असे असताना त्यांना लोकल प्रवासाची परवानगी न देणे, हे असंवेदनशीलपणाचे नाही का?,” असा सवालही त्यांनी आपल्या पत्रात केला आहे.

    लाड यांनी पुढे म्हटले आहे की, आज अनेक पत्रकारांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. आपल्या सेवेचा भाग म्हणून त्यांना मुंबईच्या उपनगरांमधून दूरवरून प्रवास करून यावे लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी लोकलचा प्रवास महत्वाचा असतो आणि अशावेळी आणखी कोणती दुर्घटना घडण्याआधी सरकारने त्यांना लोकल प्रवासाची सोय उपलब्ध करून द्यावी. चौथ्या स्तंभाचे आपण गोडवे गात असतो, मात्र त्यांना या किमान सुविधा पुरवीणेही गरजचे आहे, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.