दहीहंडी साजरी करण्याचा मनसेचा हट्ट, अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात तर शिवसेना – राष्ट्रवादी नेत्यांच्या हंड्या रद्द

दहीहंडी साजरी करता यावी म्हणून मनसेचे ठाणे-पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज आमरण उपोषण सुरू केले. मात्र, जाधव यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून त्यांना नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तर ठाण्यात जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक यांच्यासह वरळीत सचिन अहीर यांच्याकडून साजरा होणारा उत्सव रद्द करून आरोग्य शिबीरे घेतली जात आहेत.

  मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मुंबई ठाणे परिसरातील राजकीय नेत्यांकडून लाखो रूपयांच्या दहीहंडी लावून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरी करण्याची प्रथा गेल् दोन वर्षापासून कोविड-१९च्या निर्बंधामुळे बाजुला पडली आहे. मात्र या मुद्द्यावर मनसे अधिक आक्रमक झाली आहे. दहीहंडी साजरी करता यावी म्हणून मनसेचे ठाणे-पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज आमरण उपोषण सुरू केले. मात्र, जाधव यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून त्यांना नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तर ठाण्यात जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक यांच्यासह वरळीत सचिन अहीर यांच्याकडून साजरा होणारा उत्सव रद्द करून आरोग्य शिबीरे घेतली जात आहेत.

  मनसैनिकांचे आमरण उपोषण

  मनसेने दहीहंडी साजरी करता यावी म्हणून नौपाडा येथील भगवती मैदानात स्टेज बांधला होता. या ठिकाणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी आमरण उपोषण सुरू केले होते. तसेच ठिय्या आंदोलनही सुरू करण्यात आले होते. मात्र, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी जाधव यांनी घटनास्थळी जावून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मनसे सैनिकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची एक तुकडी घटनास्थळी आली होती. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला.

  नियमांचे पालन करून दहीहंडी साजरी करू द्या

  कोविड-१९च्या नियमांचे उल्लंघन करत दहीहंडी साजरी करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांची तयारी सुरू होती, असे पोलिसांकडून सांगण्यात येते. तर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. दहीहंडी साजरी होणारच. आम्ही कायदा हातात घेतला नाही. आम्हाला नियम द्या, आम्ही नियमांचे पालन करून दहीहंडी साजरी करायला तयार आहोत, असे जाधव यांनी सांगितले. दरम्यान, दहीहंडी साजरी करण्यासाठी मनसेने भगवती मैदानात स्टेज बांधला आहे. हा स्टेज पोलिसांकडून तोडण्यासाठी पोलिसांनी मैदानात कुमक मागवली. त्यामुळे मनसे आणि पोलीस आमनेसामने दिसत आहे.

  ठाण्यात नाही तर दादर माहिम मध्ये दहीहंडी होईल

  अविनाश जाधव यांना जरी ताब्यात घेतले असले तरी मनसेकडून ठाण्यात दहीहंडी साजरी करणारच, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. ठाण्यात नाही झाली तर दादर माहिम मध्ये दहीहंडी होईल किंवा मनसैनिक जेलमध्ये जातील. कोणाकोणाला तुरूंगामध्ये टाकता त्यांना टाका असे आव्हान मनसेकडून देण्यात आले. दहीहंडी उत्सवावर जरी सरकारने निर्बंध घातले असले तरी मनसेकडून आयोजित करण्यात आलेला दहीहंडी उत्सव आम्ही साजरा करणारच अशी भूमिका मनसेने घेतली आहे.

  मुख्यमंत्री फक्त हिंदू सणांवर निर्बंध घालतात

  मनसेने अगदी मोजक्याच ठिकाणी योग्य ती काळजी घेऊन हे आयोजन केले होते. मात्र मुख्यमंत्री फक्त हिंदू सणांवर निर्बंध घालतात. त्यापेक्षा उपाययोजना केल्या असत्या तर बरे झाले असते अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा असो किंवा शिवसेनेने केलेली आंदोलन असो त्यावेळी कोरोना कुठे गेला होता? शिवसैनिकांना कोरोना होत नाही का? असा सवालही त्यानी उपस्थित केला.

  संस्कृती प्रतिष्ठानचा दहीहंडी ऐवजी आरोग्य उत्सव

  दरम्यान, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आल्याचे दोन दिवसांपूर्वीच सांगितले. कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढतो आहे. गेल्या तीन दिवसांचा आलेख पाहिला तर कोरोनाचे सावट वाढते आहे असे वाटू लागले. नव्या केसेसही समोर येऊ लागल्या आहेत. एकाच सोसायटीत १७ जणांचा कोरोना झाला. ठाण्यातही अनेकांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे ठाण्यात यावेळी संस्कृती प्रतिष्ठानचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आलेला असून त्याऐवजी आरोग्य उत्सव साजरा करणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली आहे.

  दहीहंडीत सोशल डिस्टन्स पाळू शकत नाही.

  मनसे किंवा इतर पक्षांनाही हात जोडून विनंती की हे वर्ष दहीहंडी साजरी करु नये, असे सांगताना दहीहंडीत सोशल डिस्टन्स पाळू शकत नाही. मास्क घालू शकत नाही. त्यात भरीस भर म्हणजे शेवटचे तीन थर १४ ते १६ वर्ष वयोगटातील मुलांचा असतो. आणि सध्या लहान मुलांना कोरोनाचा धोका सर्वाधिक प्रमाणात आहे, हे आपल्याला माहिती आहे, असेही सरनाईक म्हणाले.