कहां राजा भोज, कहां गंगु तेली, योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यात मनसेची पोस्टरबाजी

कहां राजा भोज, और कहां गंगु तेली, असं म्हणत त्यांनी योगी आदित्यनाथांना खिजवण्याचा प्रयत्न केलाय. कुठे महाराष्ट्राचं वैभव, तर कुठे युपीचं दारिद्र्य, असा टोला या पोस्टरमधून लगावण्यात आलाय. 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेनं मुंबईत पोस्टरबाजी केलीय.

कहां राजा भोज, और कहां गंगु तेली, असं म्हणत त्यांनी योगी आदित्यनाथांना खिजवण्याचा प्रयत्न केलाय. कुठे महाराष्ट्राचं वैभव, तर कुठे युपीचं दारिद्र्य, असा टोला या पोस्टरमधून लगावण्यात आलाय.

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी स्थापन केलेली चित्रपट सृष्टी, युपीला नेण्याचं मुंगेरीलालचं स्वप्न, अशा शब्दात आदित्यनाथांवर मनसेनं टीका केलीय.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वीच त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला (बीएसई) भेट दिली. त्यांच्या हस्ते लखनऊ नगर निगमच्या बॉण्डचं लिस्टिंग करण्यात आलं.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा कार्यक्रम संपल्यानंतर योगी आदित्यनाथ उद्योजक आणि बॉलिवूड सेलिब्रेटींना उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करतील. या बैठकीत दिग्दर्शक सुभाष घई, बोनी कपूर, टी सीरिजचे भूषण कुमार, झी स्टुडिओचे जतीन सेठी, नीरज पाठक, आणि राजकुमार संतोषी उपस्थित राहतील अशी माहिती अधिकाऱ्याने फ्री प्रेस जर्नलला दिली आहे.

सप्टेंबर महिन्यात योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली होती. देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज असून आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार असल्याचं ते म्हणाले होते. अनेक सेलिब्रेटींनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. योगी आदित्यनाथ यांनी यासंबंधी लखनऊतही बैठक घेतली होती.

योगी आदित्यनाथ यांनी फिल्मसिटी उभारण्यासाठी नोएडा जवळील यमुना एक्स्प्रेसवेवर असणारी १००० एकर जागाही राखून ठेवली आहे. ही फिल्मसिटी बॉलिवूडपेक्षाही मोठी असेल असं योगी आदित्यनाथ यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयावर जोरदार टीका केली होती.