पश्चिम बंगालमध्ये भाजप चितपट; राज ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचे खास कौतुक

भाजपसाठी प्रतिष्ठेची बनलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणूकीत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी आपली ताकद सिद्ध करुन दाखवली आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी एक हाती सत्ता मिळवली आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जींचे खास कौतुक केले आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत ममतांचे अभिनंदन केले आहे.

    मुंबई : भाजपसाठी प्रतिष्ठेची बनलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणूकीत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी आपली ताकद सिद्ध करुन दाखवली आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी एक हाती सत्ता मिळवली आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जींचे खास कौतुक केले आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत ममतांचे अभिनंदन केले आहे.

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये मिळालेल्या लक्षणीय यशासाठी ममता बॅनर्जींचे अत्यंत मनापासून अभिनंदन. संघर्ष हा तुमच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिला आहे आणि या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही हे नेत्रदीपक यश मिळवलं. कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची खूप मोठी परंपरा, या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल ह्याच्यात खूप समानता आहे असं ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.

    राज्यांची स्वायत्तता आणि प्रांतिक अस्मिता यांचे महत्त्व तुम्ही नक्कीच समजू शकता. राज्यांच्या स्वायत्ततेसाठी आग्रही आवाज तुम्ही बनाल आणि सर्वसमावेशक भूमिका घेत पश्चिम बंगालचा विकास साधाल अशी आशा व्यक्त करतो. तुम्हाला मिळालेल्या यशासाठी तुमचं आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन असं देखील राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

    या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि भाजपा यांच्यात थेट लढत झाली. बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आपली सर्व ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: प्रचारासाठी मैदानात उतरले होते. तर, अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्येच तळ ठोकला होता. मात्र, मोदी-शहांच्या कराऱ्या ताकदीला ममत बॅनर्जी यांनी जोरदार टक्कर दिली. प. बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या हाती सत्ता दिली आहे.