मोदी दिलदार, महाराष्ट्राला 1500 कोटी देतील; संजय राऊतांचा टोला

महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व गोवा या राज्यांना चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील चक्रीवादळाची पाहणी करून नुकसान भरपाईसाठी 1 हजार कोटींची मदत जाहीर केली. मात्र, महाराष्ट्रासाठी अद्याप कोणतेही पॅकेज जाहीर करण्यात आलेले नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. याचीच री ओढत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, मोदी दिलदार असून ते महाराष्ट्राला 1500 कोटी देतील, असा खोचक टोला लगावला आहे.

  मुंबई : महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व गोवा या राज्यांना चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील चक्रीवादळाची पाहणी करून नुकसान भरपाईसाठी 1 हजार कोटींची मदत जाहीर केली. मात्र, महाराष्ट्रासाठी अद्याप कोणतेही पॅकेज जाहीर करण्यात आलेले नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे. याचीच री ओढत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी, मोदी दिलदार असून ते महाराष्ट्राला 1500 कोटी देतील, असा खोचक टोला लगावला आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील चक्रीवादळाची पाहणी करून तत्काळ मदत केली. मोदींचे संपूर्ण देशाकडे लक्ष असते. त्यामुळे ते महाराष्ट्राला नक्की मदत करतील व चक्रीवादळातील नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्र राज्याला 1500 कोटींची मदत देतील. मोदींचे विमान महाराष्ट्राकडेही कधीतरी वळेल. ते दिलदार आहेत असे संजय राऊत म्हणाले.

  पंतप्रधान देशाचा असतो. मात्र नरेंद्र मोदी केवळ गुजरातचेच पंतप्रधान आहेत, असे वागत आहेत. मोदींनी गुजरातचा दौरा केला. मात्र, चक्रिवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसला असताना ते इकडे फिरकले नाहीत. त्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार टिका केली. नरेंद्र मोदी केवळ गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे का वागत आहेत, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करुन विचारला आहे.

  चक्रीवादळाने देशाची पश्चिम किनारपट्टी उध्वस्त केली. त्याचा परिणाम पाच राज्यांत झाला आहे. मात्र तरीही पंतप्रधान मोदी यांनी फक्त गुजरातचा दौरा केला व आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यामुळे मोदी गुजरातचे पंतप्रधान आहेत, असे वागत आहेत. ते असे का वागतात? मोदी यांचे अन्य राज्य व तेथील लोकांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप
  काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

  महाराष्ट्रातल्या कोकण विभागाला चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे व नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरातचा दौरा करून गुजरातलाच एक हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत केली. पण महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत या वादळाने झालेल्या नुकसानभरपाईबाबत कवडीची मदतच काय पण विचारपुसदेखील केली नाही. महाराष्ट्राला सापत्न वागणूक का? असा सवाल अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.