…मग रातोरात मुख्यमंत्री का बदलला?, हेच का गुजरात मॉडेल? सामना अग्रलेखातून मोदी सरकारला निशाणा

भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे ‘मॉडेल’ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. भूपेंद्र पटेल यांच्यावर आता गुजरातचा भार पडला आहे. वर्षभरात विधानसभांच्या निवडणुका आहेत. पटेल यांना पुढे करून नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे. गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय?, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

    गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा तडखाफडकी राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. तसेच विजय रूपाणी यांच्यानंतर गुजरातच्या भविष्यासाठी आणि विकासासाठी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. परंतु या बदलीवरून आणि गुजरात मॉडेलबाबत सामना अग्रलेखातून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.

    गुजरात राज्य जर विकास, प्रगतीच्या मार्गावर पुढे जात होते, तर मग अशा पद्धतीने रातोरात मुख्यमंत्री बदलाची वेळ का आली? कोठे काय बदलायचे हा त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. भाकरी ही फिरवावीच लागते, पण एखादे राज्य जेव्हा विकास किंवा प्रगतीचे ‘मॉडेल’ असल्याचे आदळआपट करीत सांगितले जाते, तेथे अचानक नेतृत्वबदल घडवला की, मग लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. भूपेंद्र पटेल यांच्यावर आता गुजरातचा भार पडला आहे. वर्षभरात विधानसभांच्या निवडणुका आहेत. पटेल यांना पुढे करून नरेंद्र मोदी यांनाच लढावे लागणार आहे. गुजरात मॉडेल म्हणायचे ते हेच काय?, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

    ‘कोण हे महाशय?’

    पंतप्रधान मोदी यांच्या ‘मन की बात’विषयी नेहमीच उत्सुकता असते. ज्या विषयांची कोणालाही कल्पना नसते असे अनेक विषय धुंडाळून मोदी ‘मन की बात’ व्यक्त करीत असतात. अगदी खेळण्यांपासून ते पाळण्यांपर्यंत, पण त्यांच्या मनात काय चालले आहे याचा शोध घेणे कठीण आहे, हे गुजरातच्या मुख्यमंत्री निवडीवरून स्पष्ट दिसले. भूपेंद्र पटेल हे गुजरातचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचे नाव समोर आले तेव्हा ‘कोण हे महाशय?’ असा प्रश्न बहुतेक सगळ्यांनाच पडला.

    ‘मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही’ हाच मोदींचा संदेश

    विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा पुढच्या दोन दिवसांत उपमुख्यमंत्री नितीन पटेल, गोवर्धन जदाफिया, मनसुख मांडवीय, सी. आर. पाटील अशी अनेक नावे चर्चेत आणून मीडियातील चर्वण पद्धतशीर सुरू ठेवले. आपण मोदींच्या जवळ आहोत व मोदींच्या मनात काय चालले आहे हे फक्त आपल्यालाच कळते असे अनेक पत्रकारांना वाटत होते व ते मोदी ‘यालाच’ किंवा ‘त्यालाच’ मुख्यमंत्री करतील असे सांगत होते. भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक करून मोदी यांनी या सर्व तथाकथित जवळच्या लोकांना अवाक् केले. ‘मी कोणाचा नाही, माझे कोणी नाही’ हाच संदेश मोदी यांनी दिला आहे. असं अग्रलेखात म्हटलं आहे.