मोदींनी निर्णय घ्यावा, त्यांच्या हातात हुकमाची पानं आहेत ; खासदार संजय राऊत यांनी मांडली भूमिका

छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना भेटत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असायला हवी. मोदींनी निर्णय घ्यावा, त्यांच्या हातात हुकमाची पानं आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, वारंवार भेटीची वेळ मागूनही पंतप्रधानांनी वेळ दिली नसल्याचं संभाजीराजे यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे.

    मराठा आरक्षणाच्या चर्चेमध्ये आता भाजपा खासदार संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी राज्य सरकारला येत्या ६ जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत ठोस पावलं उचलली गेली नाहीत, तर आक्रमक धोरण अवलंबण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे.

    छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना भेटत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असायला हवी. मोदींनी निर्णय घ्यावा, त्यांच्या हातात हुकमाची पानं आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, वारंवार भेटीची वेळ मागूनही पंतप्रधानांनी वेळ दिली नसल्याचं संभाजीराजे यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे.

    छत्रपती संभाजी राजे हे महाराष्ट्रातले सन्माननीय नेते आहेत. शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांचा संताप, त्यांची भूमिका सरकारने समजून घेण्याची गरज आहे. सरकार ती समजून घेत आहे. माझ्या माहितीप्रमाणे राज्यातल्या प्रमुख नेत्यांना ते भेटत आहेत. शरद पवार, मुख्यमंत्री, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांना ते भेटले आहेत. पण सगळ्यात प्रमुख भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असायला हवी. कारण हा प्रश्न आता राज्याच्या हातात राहिलेला नाही. तो केंद्राच्या अखत्यारीत गेला आहे, असं संजय राऊत म्हणाले.