कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह बंदिस्त करणाऱ्या कर्मचाऱ्याला विशेष भत्ता – ५०० रुपये कोणाच्या खिशात जाणार ?

नीता परब, मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आत्तापर्यंत मुंबईत कोरोनाने ५२८ जणांचा बळी घेतला आहे. एकीकडे मृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढत जात आहे तर दुसरीकडे हे मृतदेह

 नीता परब, मुंबई : मुंबईमध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आत्तापर्यंत मुंबईत कोरोनाने ५२८ जणांचा बळी घेतला आहे. एकीकडे मृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढत जात आहे तर दुसरीकडे हे मृतदेह बंदिस्त(पैकी)  करण्याचे जोखमीचे काम पालिका कर्मचारी जीव धोक्यात घालून करत आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे पालिका आरोग्य विभागाने मॄतदेह बंदिस्त करणाऱ्या व हे जोखमीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रत्येक मॄतदेहामागे पाचशे रूपये रोख विशेष प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. पण दुसरीकडे, मात्र हे ५०० रूपये मिळणार कोणत्या कर्मचाऱ्याला यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

गेल्या २ महिन्यांपासून कोरोनाने मुंबईला आपल्या विळख्यात ओढले आहे. कोरोनाबाधितांची संख्या १४५३३ झाली असून मृत्यू ५२८ झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोरोना विषाणुने मृत्यू झालेल्यांचे मॄतदेह बंदिस्त करण्यासाठी पालिका कर्मचारी धजावत नाहियेत. त्यामुळे प्रशासनाने क्लृप्ती काढली आहे, हे मॄतदेह बंदिस्त करण्याऱ्या पालिकेच्या नियमित कर्मचारी, कंत्राटी, रोजन्दारी यापैकी कोणत्याही कर्मचाऱ्याने मॄतदेह बंदिस्त करण्याचे काम केल्यास त्याला ५०० रूपये रोख रक्कम दिली जाईल. या कामात २ व्यक्तिंचा सहभाग असल्याने १००० रूपये दिले जातील, असे एक पत्रक काढून सुचना देण्यात आली आहे. दरम्यान, मॄतदेह बंदिस्त करण्याचे जोखमीचे काम करण्याकरिता पालिकेच्या अनेक कर्मचाऱ्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असतो, मग हे ५०० रूपये मिळणार कोणाला ? यावरुन भविष्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

वॉर्डमध्ये मृत्यू झाल्यानंतर हा मृतदेह वॉर्डमधील वॉर्डबॉय, आया हे मॄतदेहाला बंदिस्त करण्याचे काम वॉर्डमध्ये करतात, त्यांनतर हा मॄतदेह शव विच्छदेन विभागात गेल्यास तिथले कर्मचारी मॄतदेह रुग्णवाहिकेत ठेवतात, शिवाय बंदिस्तही करतात. त्यामुळे प्रोत्साहन भत्ता कोणाला मिळणार यावर कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.  शिवाय कर्मचाऱ्यांना  प्रशासनाने दिलेले पीपीई किट हे तकलादु आहेत, त्याची गुणवत्ता चांगली नसल्याची तक्रार अनेक चतुर्थश्रेणी कामगारानी मागील काही दिवसांपासून वारवार केली आहे. ज्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. दरम्यान,  बंदिस्त करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग झाल्यास त्याला आरोग्य विभाग काय संरक्षण देणार? विमा कवच, कुटुंबाला मदत करणार का ? यामुळे ५०० रूपये आणि बंदिस्त मॄतदेह याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. याबाबत सायन रुग्णालयाचे डीन डॉ. रमेश भारमल यांना संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.