महाराष्ट्राचा देशात नवा विक्रम, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या एक कोटीच्या वर, मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक

संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम(Vaccination Record In Maharashtra) महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला.

    मुंबई: कोरोना विरुद्धच्या लढाईत(Fight Against Corona) महाराष्ट्रात (Maharashtra)  एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे(Vaccination) दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले आहे. संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम(Vaccination Record In Maharashtra) महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला. दाेन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्याकामी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे.

    साेमवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी ६४ हजार ३०८ एवढी झाली आहे.

    लसीकरणामध्ये नवनवीन विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविले जात आहे. आतापर्यंत राज्यातील तीन कोटी १६ लाख ९ हजार २२७ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर साेमवारी सुरु असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झाला, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

    दरम्यान, राज्यात साेमवारी सुमारे ४१०० लसीकरण केंद्र सुरु असून त्याद्वारे सायंकाळी ४ वाजेपर्यंत तीन लाख ७५ हजार ९७४ नागरिकांचे लसीकरण झाले. संध्याकाळी उशीरापर्यंत या संख्येत वाढ होऊ शकते, असे डॉ.व्यास यांनी सांगितले.