मुंबईत ३३ लाखांहून अधिक नागरिक कंटेन्मेंट झोनमध्ये

मुंबई : कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रशासन अतोनात प्रयत्न करत आहे. मात्र सहा महिने झाल्यानंतरही मुंबईतील(mumbai) ३३ लाखाहून अधिक नागरिक कंटेन्मेंट झोनमध्ये(containment zone) आहेत. त्यामुळे मुंबईत आज ही परिस्थिती ठीक नसल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत ६११ अॅक्टीव्ह कंटेन्मेंट झोन आहेत. त्यात ७ लाख ८ हजाराहून अधिक घरांचा समावेश आहे. तर ३३ लाख ९ हजाराहून अधिक लोक सध्या कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत. गेल्या सहा महिन्यात आतापर्यंत १,०४८ कंटेन्मेंट झोन शिथिल करण्यात आले आहेत.कंटेन्मेंट झोनमधील ९,८६५ इमारती सील करण्यात आल्या आहेत. त्यात २ लाख ९ हजार इमारतींचा समावेश आहे. तर ११ लाख ५ हजार नागरिक वास्तव्यास आहेत. आतापर्यंत २५,९४८ इमारती या कंटेन्मेंट झोनमधून वगळण्यात आल्या आहेत.

मुंबईतील २४ विभागांपैकी आर मध्य आणि आर दक्षिण विभागात हजाराहून अधिक इमारती सील करण्यात आल्या आहेत. आर मध्य मध्ये १,३३५ तर आर दक्षिण मध्ये १,०१० इमारती सील कऱण्यात आल्या आहेत. तर ६ विभागात प्रत्येकी ५०० हून अधिक इमारती सील करण्यात आल्या आहेत. ई विभागात सर्वात कमी म्हणजे ३७ इमारती सील करण्यात आल्या आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण १,८४,३१३ बाधित झाले असून २७,६६४ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. त्यात १८३७५ लक्षणे विरहीत रूग्ण असून ७९६६ रूग्णांना लक्षणे जाणवत आहेत. तर १३२३ रूग्ण गंभीर आहेत. आतापर्यंत१४७८०७ रूग्णांना घरी सोडण्यात आले असून ८४६६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर ५ टक्के इतका आहे.

मुंबईतील रोज होत असलेल्या चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. शिवाय मृत्यूदरावर विशेष लक्ष देण्यात आले असून मृत्यूदर कमी करण्यावर भर दिली जात आहे. गंभीर रूग्णांच्या उपचारासाठी खासगी रूग्णालयांतील तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन ही घेण्यात येत आहे.

आय एस चहल , मुंबई महापालिका आयुक्त

सील इमारती – ९८६५
घरांची संख्या – २,०९,०००
लोकसंख्या – ११,०५,०००
शिथिल इमारती – २५,९४८
…………………………………..
एकूण रूग्णसंख्या – १,८४,३१३
अॅक्टीव्ह रूग्ण – २७,६६४
लक्षणे विरहीत रूग्ण – १८,३७५
लक्षणे असलेले रूग्ण -७,९६६
गंभीर रूग्ण – १,३२३ 
बरे झालेले रूग्ण – १,४७,८०७
मृत्यू – ८४६६