राज्यभरातील नाभिकांचे जेलभरो आंदोलन

मुंबई सलून अँड ब्यूटी पार्लर असोसिएशनचा पाठींबा नाही मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यभरातील नाभिक, सलून चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारकडून

मुंबई सलून अँड ब्यूटी पार्लर असोसिएशनचा पाठींबा नाही

 मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यभरातील नाभिक, सलून चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने काही दिवसांपूर्वी नाभिक महामंडळाने आंदोलनही केले. पण त्याकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अखेर नाभिक महामंडळाने १८ जूनला राज्यभरात जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात मुंबईतील सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशन सहभागी होणार नसल्याने मुंबई वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यात हे आंदोलन होण्याची शक्यता आहे.

राज्यात सध्याच्या घडीला ३० लाखहून अधिक सलून व्यावसायिक, चालक, मालक आणि कामगार आहेत. सलून चालकांचा मनुष्यबळावरच किमान ५० टक्के तर ५० टक्के जागेचे भाडे, वीज बील, उत्पादनांची खरेदी, फोनबिल आणि पाणीबीलमध्ये जातो. त्यामुळे नफा नगण्य राहत आहेत. लॉकडाऊनमुळे रोजगार ठप्प झाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई सलून आणि ब्यूटी पार्लर असोसिएशनतर्फे काही दिवसांपूर्वी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळीच १५ जूनच्या नंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा महामंडळातर्फे देण्यात आला होता. त्यामुळे आता महाराष्ट्र नाभिक मंहामंडळातर्फे १८ जूनला  राज्यभरात जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

  

दरम्यान, यासंदर्भात मुंबई सलून आणि ब्यूटी पार्लर असोसिएशनचे सचिव प्रकाश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र या आंदोलनात मुंबई सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशन सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. आम्ही राज्य सरकारच्या बरोबर आहोत. त्यामुळे सध्याच्या घडीला जेलभरो आंदोलन करुन कोणताही ताण आम्ही प्रशासनावर आणण्याचा आमचा हेतू नाही. तसेच आंदोलन ठरविताना आम्हांला विश्वासात घेतले नसल्याने आम्ही आंदोलनात सहभागी होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारने लवकरात लवकर आमच्यासाठी पॅकेज जाहीर करुन सरकारने आम्हांला मदत करावी, असे आवाहन मात्र प्रकाश चव्हाण यांनी यावेळी केले.