corona

  • गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. कोरोनावर प्रतिबंध उपायांची कठोर अंमलबजावणी, तपासणी मोहीम, सर्वेक्षण, प्रतिजन चाचण्या आणि रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे त्वरीत विलगीकरण या सर्व गोष्टींक़डे भर दिल्याने रूग्णवाढीच्या प्रमाणात घट होताना दिसत आहे.

मुंबई :  संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. कोरोनावर प्रतिबंध उपायांची कठोर अंमलबजावणी, तपासणी मोहीम, सर्वेक्षण, प्रतिजन चाचण्या आणि रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे त्वरीत विलगीकरण या सर्व गोष्टींक़डे भर दिल्याने रूग्णवाढीच्या प्रमाणात घट होताना दिसत आहे.

मुंबई प्रशासनाने कठोर नियमांची अंमलबजावणी केल्यामुळे अवघ्या १५ दिवसांमध्ये उत्तर मुंबईत ३० टक्क्यांनी कोरोना रूग्णांची घट झाली आहे. त्याचप्रमाणे ठाणे मनपा क्षेत्रात आणि जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येने उच्चांक गाठला होता. परंतु ठाणे शहरातील कोरोनाबाधित रिकव्हरी रेट हा ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच ठाणे शहरात १५ टक्के कोरोनाबाधितांवर कोरोनाच्या विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. ठाणे शहरातील वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, मुंब्रा परिसर, तर कल्याण-डोंबिवली शहरांतील कल्याण पूर्व परिसर, उल्हासनगर आणि भिवंडी शहर यांसारख्या संक्रमित भागांचा समावेश आहे. या भागांमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण गेल्या आठवडय़ापासून घटल्याचे दिसत आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात मागील महिन्यात दररोज ४५० हून अधिक रुग्ण आढळत होते. मात्र, महापालिका प्रशासनाने शहरातील चाचण्यांची संख्या वाढवल्याने तसेच सर्वेक्षण आणि प्रतिजन चाचण्यांवर भर दिल्यामुळे ऑगस्टच्या सुरुवातीपासून शहरात दिवसाला ३५० पेक्षा कमी रुग्ण आढळत आहेत. उल्हानगर महापालिका क्षेत्रात दिवसाला २०० ते २५० आणि भिवंडी महापालिका क्षेत्रात ८० ते ९० रुग्ण आढळत होते.  मात्र, या दोन्ही महापालिकांवर नव्याने नियुक्त झालेल्या प्रशासकीय प्रमुखांनी आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यावर अधिक भर दिला. त्यामुळे जुलैच्या अखेरीपासून या दोन्ही शहरांत कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या उल्हासनगर शहरात दिवसाला ४० हून कमी रुग्ण आढळत आहेत, तर भिवंडी शहरात दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या २५ हून कमी झाली आहे.