…जर समाजाला आरक्षण मिळणार असेल तर..,खासदार संभाजीराजांची राजीनाम्याची तयारी

    सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजात प्रचंड असंतोष आहे. त्यासाठी संभाजीराजे भोसले यांनी सोमवारपासून महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. टाऊन हॉल परिसरातील नर्सरी गार्डनमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून त्यांनी राज्याच्या दौऱ्याला सुरुवात केली.

    सोलापूरमधील दौऱ्यादरम्यान मराठा समाजाशी चर्चा केल्यानंतर संभाजीराजे भोसले यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यावेळी संभाजीराजे म्हणाले, उद्याच खासदारकीचा राजीनामा द्याची माझी तयारी आहे. मी खासदारकीचा राजीनामा दिल्याने जर समाजाला आरक्षण मिळणार असेल तर मी कधीही राजीनामा द्यायला तयार आहे. तसेच खासदार असल्यामुळे आपण अनेकदा सरकारवर दबाव टाकून कामे मार्गी लावू शकेल. असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

    तसेच दिल्लीत सर्वात मोठी शिवजयंती आपणच साजरी केली, त्यावेळीही मी खासदार असल्याने राष्ट्रपतीपासून ते अनेक दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित होते. त्यावेळी मी दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र आजही राष्ट्रपती भवनात आहे. संसदेतही शाहू महाराजांची जयंती मी साजरी केली त्यामुळे, खासदार असल्याने सोबत राहून आपली कामे करून घेत येतात, असेही संभाजीराजे यांनी सांगितले.

    संभाजीराजे यांनी पत्रकारांशी बोलताना असे सांगितले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही फोन आला होता. आरक्षणप्रश्नी चर्चा करण्यासाठी भेटण्यासाठी त्यांनी विनंती केली. पण मी राज्याच्या दौऱ्यावर असल्याचे सांगितले. त्यांच्याशी आणि विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी २७ किंवा २८ मे रोजी बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आरक्षण विषयी दिशा स्पष्ट केली जाईल, अशी घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली.