MPSC परीक्षा येत्या आठवड्याभरात होणार; उद्याच तारीख जाहीरही करणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

पुन्हा लॉकडाऊनची वेळ येणार नाही. यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. या परीक्षेसाठी वयाची मर्यादा असणार नाही. विद्यार्थ्यांनी याची काळजीच करून नये असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.परीक्षेसाठीचा स्टाफही कोरोना निगेटिव्ह असला पाहिजे यासाठी त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

    मुंबई : एमपीएससी परीक्षेवरून आज दुपारी झालेल्या गदारोळाचे प्रतिसाद पुण्यात आणि त्यानंतर ठिकठिकाणी उमटले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. १४ मार्चला होणारी परीक्षा ही पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेची तारीख उद्या जाहीर होणार आहे. येत्या आठवड्याभरात परीक्षा होणार असल्याचे आश्वासन यावेळी उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिले. परीक्षेवरून विरोधकांनी राजकारण करू नये अशा कानपिचक्याही त्यांनी विरोधकांना दिल्या.

    ते पुढे म्हणाले, पुन्हा लॉकडाऊनची वेळ येणार नाही. यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. या परीक्षेसाठी वयाची मर्यादा असणार नाही. विद्यार्थ्यांनी याची काळजीच करून नये असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.परीक्षेसाठीचा स्टाफही कोरोना निगेटिव्ह असला पाहिजे यासाठी त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

    नियम पाळा आणि संसर्ग वाढणार नाही याची काळजी घ्या

    कोरोनाची वाढती  रुग्णसंख्या लक्षात घेता मुख्यमंत्री म्हणाले,  धोका वाढतो आहे. आता दर दिवसाला कोरोना रुग्णांची संख्या १० ते ११ हजारांनी वाढते आहे. लसीकरणही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. संसर्ग झाल्यानंतरही अनेकजण चाचणी करून घ्यायला नकार देत आहेत. होम क्वारंटाईन झालेल्यांनी कृपया घराबाहेर जाऊ नका. यामुळे कुटुंबेच्या कुटुंबे बाधित होत आहेत. यापैकी एखादाही गंभीर झाला तर ही जबाबदारी कोणाची? यात आपण आता सुधारणा करतो आहोत. बंधने आपल्याला स्वत:हून पाळावीच लागतील. लस घेतल्यानंतरही मास्क वापरणे अनिवार्य आहे. येत्या १ ते दोन दिवसांत नियमावली जाहीर करणार आहोत. ब्राझीलमध्ये कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. लवकर चाचणी करा, त्यामुळे सगळेच सुरक्षित राहतील.