अतिवृष्टीने कोलमडलेल्या मुंबईचे तीव्र पडसाद; प्रशासनाच्या निषेधार्थ स्थायी समिती तहकूब

  मुंबई : दरड कोसळून आणि पडझडीच्या घटनांमध्ये झालेल्या दुर्घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निषेध करणारा सभा तहकूबीचा प्रस्ताव मांडण्याची तयारी भाजपाने केली होती. मात्र, सत्ताधारी शिवसेनेने गंभीर विषयावर चर्चा न करता पळ काढत शोक प्रस्ताव मांडून सभा तहकूब केली, असा गंभीर आरोप भाजपने केला आहे. दुर्घटनांच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

  शिवसेनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपला यानिमित्ताने मृतांच्या टाळूवरील लोणी खायचे होते. भाजप दुःखद घटनांचेही राजकारण करू पाहत असते, असा आरोप करीत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपवर पलटवार केला. त्यामुळे मुंबईत नुकत्याच झालेल्या दुर्घटनांच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेना यांच्यात राजकीय आरोप – प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

  मुंबईत १८ जुलै रोजी मुसळधार पावसामुळे चेंबुर, विक्रोळी व भांडुप या ठिकाणी दरड, भिंत, घर कोसळून झालेल्या दुर्घटनांत ३२ निष्पाप नागरिकांचे बळी गेले. या दुर्घटनांना पालिकेचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप पालिकेतील भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. या दुर्घटनांबाबत दुःख व्यक्त करीत भाजपतर्फे आज स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा घडवून आणून प्रशासनाचा निषेध व्यक्त करून सभा तहकूब करण्याची मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे सभेपूर्वी पत्राद्वारे केली होती.

  आज दुपारी स्थायी समितीची सभा सुरू झाल्यावर समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, स्वतःच्या अधिकाराचा वापर करीत सदर दुर्घटनांबाबत शोक व्यक्त करीत कोणतेही कामकाज न करता सभा झटपट तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला. यावेळी, भाजपने त्यांची तहकुबी चर्चेला घेण्याबाबत प्रयत्न केला. मात्र त्यांना समिती अध्यक्ष यांनीच सभा तहकुबी मांडून सभा तहकूब केल्याने भाजपची चांगलीच अडचण केली.

  मुंबईत दरडी कोसळून ३२ जण मृत पावल्याच्या घटना घडूनही त्यावर साधकबाधक चर्चा न करता पालिका प्रशासन आणि असंवेदनशील सत्ताधारी शिवसेनेने चर्चेपासून पळ काढला आहे.

  – प्रभाकर शिंदे, गटनेते, भाजप

  भाजप प्रत्येक घटनेचे राजकारण करते. दुःखद घटनेचेही राजकारण केले जात आहे. त्यामुळे असे प्रकार म्हणजे मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे भाजपने दरवेळी दुःखद घटनेचीही राजकारण करू नये.

  – यशवंत जाधव, अध्यक्ष, स्थायी समिती