सावधान! मुंबई कोरोना पुन्हा वाढतोय ; पालिकेसमोर मोठे आव्हान उभे

मुंबईत गेल्या वर्षी कोरोनाने शिरकाव केल्यानंतर मागील दीड वर्षापासून मुंबईकरांचा कोरोनाशी लढा सुरु आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाने कहर केला होता. या लाटेत झोेपडपट्टया, चाळींसह इमारतीत कोरोनाने शिरकाव केला होता. दाटीवाटीच्या वसाहतींमध्ये कोेरोना पसरल्याने पालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.

  मुंबई – मुंबईत कोरोनाची आटोक्यात आलेली रुग्णसंख्या गेल्या चार दिवसांपासून पुन्हा वाढत असल्याने चिंता वाढली आहे. २३ ऑगस्टला २२६ वर आलेली रुग्णसंख्या आज ऑगस्टला वाढून ३८८ वर पोहचली. २७ ऑगस्टला रुग्णसंख्या काहीअंशी कमी होऊन ३६४ वर आली आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे रुग्ण दुपटीचा कालावधीही १९८३ वरून १७४७ दिवसांवर घसरला आहे. त्यामुळे कोरोना पुन्हा डोकेवर काढत असल्याची भिती वाढते आहे.

  मुंबईत गेल्या वर्षी कोरोनाने शिरकाव केल्यानंतर मागील दीड वर्षापासून मुंबईकरांचा कोरोनाशी लढा सुरु आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाने कहर केला होता. या लाटेत झोेपडपट्टया, चाळींसह इमारतीत कोरोनाने शिरकाव केला होता. दाटीवाटीच्या वसाहतींमध्ये कोेरोना पसरल्याने पालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने लॉकडाऊन केले. कडक निर्बंधांची अंमलबजावणी व पालिकेची प्रभावी उपाययोजना यांच्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले.

  रोज २८०० पर्यंत नोंद होणारी रुग्णसंख्या घटली. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंधांत शिथीलता दिली. मात्र या दरम्यान, सणासुदीच्या निमित्ताने वाढलेली गर्दी, विनामास्क, सोशल डिस्टनसिंगचा ऐसी तैशीमुळे कोरोना पुन्हा वाढायला सुरुवात झाली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ३३४ वर असलेली रुग्णसंख्या फेब्रुवारीच्या अखेरपासून वाढायला सुरुवात झाली. कोरोनाच्या दुस-या लाटेनेही कहर केला. यावेळी रुग्णसंख्या झपाट्याने वाढली.

  रोज तब्बल ८ ते ११ हजार रुग्णांची नोंद व्हायला लागली. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे पालिकेच्या यंत्रणेवर ताण आला. रुग्णालयात ऑक्सिजन, वेंटिलेटर कमी पडल्याने रुग्णांना इतर रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्याची वेळ आली. कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने पुन्हा कडक निर्बंध लागू केले.

  पालिकेने पुन्हा सर्वेक्षण, रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा युध्द पातळीवर शोध, कंटेनमेंट झोन, चाचण्यांची संख्या वाढवली, रुग्णांची नियमित तपासणी तसेच क्वारंटाईन आदी नियमांची कडक अंमलबजावणी केल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले. रुग्णसंख्या ३०० वर आल्याने निर्बंधांत शिथीलता देण्यात आली.

  १५ ऑगस्टपासून दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्यांसाठी लोकलही सुरु करण्यात आली. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे. मात्र गर्दी वाढत असल्याने पुन्हा कोरोना वाढतो आहे. विनामास्क, सोशल डिस्टनसिंगचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याने तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळा, खबरदारी घ्या असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

  पाच दिवसांतील रुग्णांची स्थिती –

  २३ ऑगस्ट – २२६
  २४ ऑगस्ट – २७०
  २५ ऑगस्ट – ३४३
  २६ ऑगस्ट – ३९७
  २७ ऑगस्ट – ३६४
  २८ ऑगस्ट – ३८८