Mumbai Corona Update: कोरोना रुग्णांमध्ये २० टक्के वाढ; मुंबई शहरांसह उपनगरातील वाढती रुग्णसंख्या धडकी भरवणारी

पालिका आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून येत आहे की, मागील आठवड्याच्या तुलनेत गेल्या सात दिवसांत कोविड रुग्णांमध्ये तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईतील ही रूग्ण वाढ तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे का अशी शंका तज्ज्ञ डाॅक्टरांनी व्यक्त केली आहे. मात्र, कोरोना राज्य कृती दल तज्ज्ञांनी ही शंका खोडून काढत वाढत्या रुग्णसंख्येचे लाटेत परिवर्तन होताना काही निकष व टप्पे आहेत तसे सध्या तरी दिसून येत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

    मुंबई : मुंबईत गेल्या आठवड्याभरापासून वाढती कोरोना (Covid 19) रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरला आहे. गेल्या चार दिवसांपासुन ३५० ते ४०० पेक्षा जास्त रुग्णाची नाेंद झाली आहे. तर मागील आठवड्याच्या तुलनेत गेल्या सात दिवसात कोविड रुग्णांमध्ये तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांनी आराेग्याची काळजी घ्यावी, ताप असल्यास हलगर्जीपणा न करता त्वरीत डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आराेग्य विभागाने केला आहे.

    पालिका आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून असे दिसून येत आहे की, मागील आठवड्याच्या तुलनेत गेल्या सात दिवसांत कोविड रुग्णांमध्ये तब्बल २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईतील ही रूग्ण वाढ तिसऱ्या लाटेची सुरुवात आहे का अशी शंका तज्ज्ञ डाॅक्टरांनी व्यक्त केली आहे. मात्र, कोरोना राज्य कृती दल तज्ज्ञांनी ही शंका खोडून काढत वाढत्या रुग्णसंख्येचे लाटेत परिवर्तन होताना काही निकष व टप्पे आहेत तसे सध्या तरी दिसून येत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

    २१ ते २७ ऑगस्ट या आठवडाभरात मुंबईत एकूण १८९३ कोविड रुग्ण आढळले. तर २२ जणांचे मृत्यू झाले आहेत. ज्यामुळे रुग्णसंख्या ७,४०,८७० वरुन ७,४२,७६३ पर्यंत वाढली आहे. २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान, शहरात २२७९ रुग्ण आढळले, त्यात १५ मृत्यूची नोंद झाली आहे. त्यानंतर, रुग्णसंख्या ७४३,१५४ वरून ७४५,४३३ वर गेली आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस भर पडत असली तरी मुंबई शहरातील मृतांची संख्या घटली आहे. दैनंदिन सक्रिय रुग्णांचा दर जो गेल्या काही आठवड्यांसाठी १% च्या खाली होता तोही आता वाढला असला तरी ही तिसऱ्या लाटेची सुरुवात नसल्याचे वरिष्ठ डाॅक्टर सांगतात.

    चाचण्यांची संख्या वाढल्याने गेल्या सात दिवसांमध्ये रुग्ण वाढ झाली आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, २१ ते २७ ऑगस्ट दरम्यान, शहरात २,१०,१४० चाचण्या घेण्यात आल्या, ज्यात १,८९३ बाधित रुग्ण आढळले. तर २८ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान २.५६,२१४ चाचण्या घेण्यात आल्या, त्यात २,२७९ बाधित रुग्ण आढळले, म्हणजे पॉझिटिव्हीटी दर ०.८८ टक्के होता. तर मागील दीड वर्षात शहरात एकूण ९.३ दशलक्ष चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यात बाधित रुग्ण सापडण्याचा दर ७.९४ टक्के आहे.

    साेमवारी शहरात ३८३ रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानुसार, मुंबईतील रुग्णांची संख्या ७४६७२४ आणि मृत्यू १५,९९८ एवढे आहे. तसेच आतापर्यंत ७२४०७७ कोविड आजारातून बरे झालेले रुग्ण आहेत. तर, मुंबईचा रिकव्हरी रेट ९६ टक्के आहे. सध्या शहरात ३,८१५ सक्रिय रुग्ण आहेत.