Mumbai-Goa highway quadrangle 206 km from Indapur to Sindhudurg completed; Affidavit of the construction department in the court that 62% of the work of the highway has been completed

सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर श्रीकांत बांगर यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार ६२ टक्के चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेल्या या महामार्गावरून सुरळीत वाहतूक होत आहे. उर्वरित महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम प्रगतीपथावर असून ३० डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे.

    मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे रखडले काम आता टप्प्याटप्याने पूर्ण होत असून इंदापूर ते झाराप (सिंधुदुर्ग)दरम्यान ३५५ किमी पैकी २०६ किमीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच संपूर्ण महामार्गाचे एकूण ६२ टक्के काम झाले असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी)कडून गुरुवारी प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात सांगण्यात आले.

    मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य परसले आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते, असा दावा करत मूळचे कोकणातील असलेले अॅड. ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली होती. मात्र, महामार्गाचे काम समाधानकारकपणे होत असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने ११ एप्रिल २०१९ रोजी त्यांची याचिका निकाली काढली होती. मात्र, भविष्यात महामार्गाच्या कामात काही कसूर आढळल्यास पुन्हा दाद मागण्याची मुभाही याचिकाकर्त्यांना दिली होती. त्याचाच आधार घेत अॅड. पेचकर यांनी नव्याने जनहित याचिका दाखल केली आहे.

    त्यावर मागील सुनावणीदरम्यान महामार्गाच्या कामाची वस्तुस्थिती, काम पूर्णत्वास नेण्याचा कालावधी आणि कंत्राटदारांच्या नावांची यादी याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला आणि संबंधित प्राधिकरणाला दिले होते.

    त्यानुसार गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर श्रीकांत बांगर यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार ६२ टक्के चौपदरीकरणाचे काम पूर्ण झालेल्या या महामार्गावरून सुरळीत वाहतूक होत आहे. उर्वरित महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम प्रगतीपथावर असून ३० डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे.

    सदर महामार्गाचे काम कोरोना महामारी आणि पावसामुळे रखडले असल्यचेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच महामार्गावर खड्डे नसल्याचा दावा प्रतिज्ञापत्रातून कऱण्यात आला आहे. महामार्गाचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल आकारणार नाही, वशिष्ठी नदीवरील नवीन पुलाचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार असून या पुलावरील केवळ दोन लेन वाहनचालकांसाठी सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहितीही प्रतिज्ञापत्रातून देण्यात आली आहे. तसेच काम पूर्ण न करणार्‍या दिलीप बिल्डकाँन, के सी सी बिल्डकाँन, के टी इन्फ्रा, चेतक इंटरप्राईसेस, एमईपी सांजोस आदी कंत्राटदारांच्या नावाचा प्रतिज्ञापत्रात समावेश आहे.