मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर कारचे टायर फुटल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात जीएसटी उपायुक्त अभिजीत घवलेंचा मृत्यू

मुंबईहून पुण्याकडे जात असताना घवले यांच्या इनोव्हा कारच्या समोरील टायर फुटले. त्यानंतर भरधाव कार पुढे जाणाऱ्या ट्रकवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, इनोव्हा कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.

    मुंबई:यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील कामशेत बोगद्याजवळ इनोव्हा कारचे टायर फुटल्यामुळे झालेल्या भीषण अपघात जीएसटी डेप्युटी कमिशनर अभिजीत घवले यांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. घवले यांच्याबरोबर असलेल्या शंकर गोडा यतनाल यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.

    अभिजीत घवले यांच्या आई-वडिलांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळे कार्यक्रमासाठी अभिजित घवले आपल्या कुटुंबीयांसह लातूरला निघाले होते. साडू, बायको आणि चालक असे मिळून गावी चालले होते. प्रवासा दरम्यान सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जात असताना घवले यांच्या इनोव्हा कारच्या समोरील टायर फुटले. त्यानंतर भरधाव कार पुढे जाणाऱ्या ट्रकवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, इनोव्हा कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात घवले यांच्या पत्नी व वाहन चालक गंभीररित्या जखमी झाल्या आहेत. दोघांनाही उपचारासाठी सोमाटणे येथील पावना हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे