दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणी संथ कारभार, ‘आणखी किती वर्ष तपास करणार ?’ न्यायालयाने उपटले कान

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांची(dabholkar murder case) पुण्यात २० ऑगस्ट २०१३ मध्ये तर २० फेब्रुवारी २०१५  मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँम्रेड गोविंद पानसरे(pansare murder case) यांची कोल्हापुरात हत्या करण्यात आली होती. त्यामुळे पानसरे आणि दाभोलकर यांच्या हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.

  मुंबई: अंनिसचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर(narendra dabholkar) आणि कॉम्रेड गोविंद पानसरे(govind pansare) यांच्या हत्येला इतकी वर्षे लोटूनही याप्रकरणात इतकी संथ प्रगती का? असा सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी तपास यंत्रणांना फटकारले. याच प्रकरणाशी निगडीत खटले कर्नाटकात सुरू झाले. दुसरीकडे पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणातील खटल्यात आरोपींवर आरोपही निश्चित झाले आहेत. मात्र, आपल्याकडे अशा पद्धतीने कारभार सुरू राहिला तर जनतेच्या प्रश्नांना काय उत्तर देणार ? अशा प्रश्नांची सरबत्तीच खंडपीठाने तपासयंत्रणेवर केली आणि पुढील सुनावणीला तपसाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांची पुण्यात २० ऑगस्ट २०१३ मध्ये तर २० फेब्रुवारी २०१५  मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे नेते काँम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात हत्या करण्यात आली होती. त्यामुळे पानसरे आणि दाभोलकर यांच्या हत्याकांडाची स्वतंत्र यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी निवृत्त झाल्यानंतर वर्षभराच्या अवधीनंतर या प्रकरणावर शुक्रवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, दोन्ही घटनांना सहा ते आठ वर्ष लोटली तरीही सीबीआय आणि एसआयटी या दोन्ही तपास यंत्रणा अद्यापही प्रकरणाचा छडा लावू शकलेले नाहीत, असा आरोप याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला.

  दुसरीकडे, कर्नाटकमध्ये या खटल्याशी संबंधित डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी तेथील तपासयंत्रणांनी महाराष्ट्रात येऊन आरोपींना अटक केली, आता तपास पूर्ण झाला असून तिथे खटलाही सुरू झाला आहे, लंकेश प्रकरणी आरोपींवर आरोप निश्चितही करण्यात आले.

  कर्नाटकातील यंत्रणेने महाराष्ट्रात येऊन केलेल्या चौकशीमध्ये या प्रकरणातील दोन हत्यांचे धागेदोरे सापडले. त्यानंतर मात्र, महाराष्ट्रातील या दोन महत्वाच्या व्यक्तींच्या हत्येचा तपास संथ गतीने सुरू असल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केला. तेव्हा, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले हत्यार अद्याप खाडी पात्रातून सापडलेले नाही. त्याच शोध सुरू असल्याचे सीबीआयच्या वतीने सांगण्यात आले. त्याची गंभीर दखल घेत तपासात होणाऱ्या विलंबामुळे न्याय प्रक्रियेच्या कामातही विलंब होत असल्याचे भान ठेवा. ताब्यात असलेल्या आरोपींवर लक्ष न देता फरार आरोपी अटकेत कसे येतील त्यावरीही लक्ष असू द्या, शब्दात खंडपीठाने तपास यंत्रणांना सुनावले आणि तपासातील प्रगतीचा अहवाल दोन आठवड्यात सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी ३० मार्चपर्यत तहकूब केली.

  पानसरे प्रकरणात प्रगती नाहीच

  कोल्हापुरात २० फेब्रुवारी २०१५ मध्ये काँम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सहा वर्ष उलटूनही यावर अद्यापही प्रगती झाली नाही. त्यामुळे तपासयंत्रणा अजूनही तपास करण्यास अपयशीच ठरली आहे. परिणामी राज्यातील तपासयंत्रणा नक्की काय करते आहे? असा सवाल याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला. तेव्हा, पानसरे हत्याकांड प्रकरणी ताब्यात असलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार इतर फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे एसआयटीकडून सांगण्यात आले.