स्टॅन स्वामींची तब्येत खालावली, होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

फादर स्टॅन स्वामी (८४) (Father Stam Swamy) यांना वैद्यकीय उपचारांसाठी १५ दिवस होली फॅमिली खासगी रुग्णालयात दाखल करा, असे निर्देश शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने(Mumbai High Court Order) राज्य कारागृह प्रशासनाला दिले.

  मुंबई: भीमा कोरेगाव हिंसाचार(Bheema koregav Issue) तसेच एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले फादर स्टॅन स्वामी (८४) (Father Stan Swamy) यांना वैद्यकीय उपचारांसाठी १५ दिवस होली फॅमिली खासगी रुग्णालयात दाखल करा, असे निर्देश शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने(Mumbai High Court Order) राज्य कारागृह प्रशासनाला दिले.

  भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेले ८४ वर्षीय स्टॅन स्वामी तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असून त्यांना पार्किन्सन्सचा आजार आहे. स्वामी यांनी आजारपणाच्या मुद्द्यावर विशेष एनआयए सत्र न्यायालयात दाखल केलेला सुटकेसाठीचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे स्वामी यांनी उच्च न्यायालयात अपील केले आहे.

  याआधी पार पडलेल्या सुनावमीदरम्यान जे जे रुग्णालयाला स्वामीचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर शुक्रवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. आर. बोरकर यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर व्हीसीमार्फत सुनावणी पार पडली.

  स्वामी यांची तब्येत ढासळत असून त्यांच्यावर योग्य वेळी उपचार होण्यासाठी रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. मी स्वामी यांच्याशी संवाद साधला असून त्यांनी होली फॅमिली रुग्णालयात उपचार घेण्याबाबत विनंती केली आहे. तसेच त्यावर होणारा खर्चही ते स्वतः उचलण्यास तयार असल्याची माहिती स्वामी यांच्यावतीने बाजू मांडताना वकील मिहिर देसाई यांनी दिली. तसेच त्यांना सेवकाची गरज असून जवळपास एकही कुटुंबातील व्यक्ती नसल्यामुळे सेंट झेविअर्स महाविद्यालयाचे माजी प्राचार्य फादर फ्रेजर मासेरेन्हास यांना त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.

  एनआयएचे प्रतिनिधीत्व करणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी स्वामी यांनी केलेल्या युक्तिवादाला विरोध केला. जे. जे. रुग्णलयात त्याच्यावरील उपचारासाठी सर्व सुविधा आहेत आणि जर न्यायालयाने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यास परवानगी दिली. तर हे समाजापुढे सरकारी रुग्णलायांविषयी चुकीचे उदाहरण ठरेल असा दावा करत सिंग यांनी स्वामींना खासगी रुग्णलयात हलविण्यास विरोध केला. जे जे रुग्णालयाने सुचविल्यानुसार स्वामींची योग्य ते औषधोपचार आणि काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात हलविले जाऊ नये, असा युक्तिवाद राज्य कारागृह प्राधिकरणाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील जे.पी. याज्ञिक यांनी केला.

  सर्व पक्षकारांची बाजू ऐकन घेत याचिकाकर्त्यांचे (८४) वय आणि जे.जे रुग्णालयातील डॉक्टरांनी नोंदवलेल्या निष्कर्षानुसार स्वामी यांच्यावर योग्य उपचार होणे गरजेचे आहे. परंतु, कोरोनाची सद्यस्थिती आणि रुग्णाच्या वाढत्या गर्दीमुळे जे.जे. रुग्णालयात त्यांच्या तब्येतीकडे लक्ष देता येणार नाही, असे निरीक्षण खंडपीठाने आदेशात नोंदवले. तसेच स्वामी यांना १५ दिवस होली फॅमिली रुग्णलयात दाखल करण्यात यावे, त्याचा खर्च हा याचिकाकर्ते स्वतः उचलतील, मात्र, त्याचे वय पाहता त्यांच्यासोबत एक परिचारिका उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच फादर फ्रेजर मासेरेन्हास यांना नियमित अंतरावर स्वामींना भेटण्यास परवानगी दिली. तर स्वामींच्या संरक्षणासाठी रुग्णालयात पोलीस कॉन्स्टेबलला ठेवण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.