मुंबईच्या रुग्णांलयामध्येही ‘निसर्ग’ अलर्ट –  वीज गेली तर पर्यायी व्यवस्थेची तयारी

मुंबई: मुंबईवर निसर्ग चक्रीवादळाचे संकट लक्षात घेता मुंबई महापालिकेने त्यांच्या सर्व रुग्णालयांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. वादळाचे वीज गेली तर पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, असे

 मुंबई: मुंबईवर निसर्ग चक्रीवादळाचे संकट लक्षात घेता मुंबई महापालिकेने त्यांच्या सर्व रुग्णालयांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. वादळाचे वीज गेली तर पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, असे आदेशही देण्यात आले आहेत.  

मुंबईच्या दिशेने येणाऱ्या चक्रीवादळाची तीव्रता अधिक असेल तर मुंबईवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सर्व रुग्णालयांनी आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. जर वीजपुरवठा खंडित झाला तर जनरेटर तयार ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अधिक बॅटरीस, इलेक्ट्रिकचे सामानही उपलब्ध करुन घेण्यास सांगितले आहे. आपत्कालीन स्थितीत रुग्णालयातील आयसीयू, ऑपरेशन शिएटर बंद होऊ नयेत, यासाठी पर्यायी व्यवस्था उभारण्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णालय परिसरातील कचराही हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सायन रुग्णालयाचे डीन डॉ. रमेश भरकल यांनी सांगितले की, आम्ही आमच्या सर्व विभागप्रमुखांना तसेच रक्तपेढ्यांनाही आपत्कालीन स्थितीसाठी सज्ज राहण्याचे आणि योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या कोरोनाच्या संकटाशी आम्ही मुकाबला करत असलो, तरी या चक्रीवादळाने काही हानी झाल्यास त्या पीडितांवर उपचार करण्यासाठी आम्हाला तयार राहावे लागणार आहे.   
बीकेसीतील रुग्ण वरळीला हलविले  
बीकेसीच्या एमएमआरडे मैदानात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या १५० रुग्णांना सुरक्षिततेच्या कारणामुळे वरळी आणि आसपासच्या विविध रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या उप कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले की निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे रुग्णांच्या रसुरक्षेचा मुद्दा लक्षा घेऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.