मुंबईला Covid Third Wave चा धोका नाही! BMC ची न्यायालयाला माहिती

सरन्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. जनहित याचिकेत केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करण्यात आली होती की, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि पूर्णपणे अंथरुणाला खिळलेल्या लोकांचं घरोघरी लसीकरण करावं.

    मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्यापक मोहीम राबवली जात आहे. नागरिक स्वतःहून लस घेण्यासाठी येत आहेत. आतापर्यंत 42 लाख नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. 82 लाख नागरिकांचा एक डोस पूर्ण झाला आहे. त्यामुळे सध्या तरी मुंबईत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमीच आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयात दिली आहे.

    मुंबई महापालिकेचे वकील अनिल साखरे यांनी न्यायालयाला सांगितलं की, पूर्णपणे अंथरुणाला खिळलेल्या 2,586 लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आलं आहे, तर अशा 3,942 लोकांना पहिला डोस मिळाला आहे. आता लसींची कमतरता नाही. मुंबई सुरक्षित आहे. आम्हाला तिसरी लाट (कोरोना विषाणू संसर्ग) येताना दिसत नाही.

    सरन्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. जनहित याचिकेत केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करण्यात आली होती की, 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि पूर्णपणे अंथरुणाला खिळलेल्या लोकांचं घरोघरी लसीकरण करावं.

    याचिकाकर्त्यांनीही पालिकेच्या दाव्याला दुजोरा दिला. लसीकरण मोहीम योग्यरीतीने सुरू असल्याचे सांगितले. शिवाय घरोघरी लसीकरण मोहिमेला आधी नकार देणाऱ्या केंद्र सरकारनेही आता त्याबाबत धोरण आखल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यावर अंथरुणाला खिळलेले, आजारी आणि अपंग नागरिकही लसीकरणापासून वंचित राहणार नाहीत, असे नमूद करत न्यायालयाने याचिका निकाली काढली.