Local

कोरोना संक्रमणामुळे गेल्या सात महिन्यांपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद असलेली उपनगरीय लोकल सेवा कधी सुरु होणार, याची मुंबईकर आतुरतेने वाट पाहत आहेत. मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असलेली लोकल सेला सुरु झाली तर आर्थिक राजधानी पुन्हा रुळावर येणार आहे. १ नोव्हेंबरपासून लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी खुली करण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकार आणि रेल्वे याबाबत तयारीत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

मुंबई : मुंबईत लोकल सेवा अधिक काळ बंद ठेवता येणार नाहीत, याची जाणीव सरकारला आहे. यामुळेच अनलॉकच्या घोषणेनंतर मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवा हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु आहे. एसटी, बेस्ट, मेट्रो, मोनोनंतर आता लोकल सेवाही सुरु करण्यात येण्याची शक्यता आहे.

अनेक मंत्र्यांनी यापूर्वीच दिले आहेत संकेत

अनेक मंत्र्यांनीही लोकल सेवा नोव्हेंबर महिन्यात सुरु होईल असे संकेत दिले आहेत. यात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा समावेश आहे. १ नोव्हेंबरनंतर जनजीवन पूर्वपदावर येईल आणि लोकल सेवा पूर्ववत होईल असे संकेत या नेत्यांनी दिले आहेत.

कार्यालयांच्या वेळात होणार बदल ?

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा पूर्ववत सुरु झाल्यास लोकलमधील गर्दी वाढण्याचा धोका आहे,  त्यामुळे प्रवासाच्या वेळा निर्धारित करण्याची सूचना रेल्वेने सरकारला केली आहे. मुंबईतील अनेक कार्यालयांच्या वेळा बदलल्या जाऊ शकतात का, याबाबतही विचार सुरु आहे. चाकरमान्यांच्या कार्यालयीन वेळा बदलण्याबरोबरच सम, विषय फॉर्म्युल्याबाबतही सरकार विचार करते आहे. यात प्रवाशांना वेवेगळ्या दिवसांचा पास दिला जाण्याची शक्यता आहे. लोकल सुरु करण्याचा निर्णय हा राज्य सरकारला करायचा आहे, अशी स्पष्ट भूमिका यापूर्वीच रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी घेतली आहे.

उपनगरीय लोकल प्रवास हळूहळू होतोय अनलॉक

मुंबईची जीवनवाहिनी हळूहळू पूर्ण अनलॉकच्या दिशेने वाटचाल करते आहे. सुरुवातीला फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच असलेली लोकल सेवा आता महिलांसाठीही कमी गर्दीच्या वेळी खुली करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त दिव्यांग,  कँन्सरग्रस्त,  डबेवाले,  खासगी सुरक्षारक्षक,  वकील यांनाही प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.