मुंबईला तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका? रुग्ण वाढल्यास काय करणार? BMC चे जबरदस्त प्लानिंग

सद्या मुंबईतील रुग्णसंख्या तीनशेच्या खाली घसरली आहे. मृत रुग्णांची संख्याही एकेरी आकड़्यावर आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सद्या उपलब्ध असलेल्या ३० हजार बेड्सपैकी फक्त ६०० बेड्स रुग्णांनी भरलेले आहेत. रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंधांत शिथिलता देण्यात आली आहे. शिवाय सणासुदीचे दिवसही आता सुरु होणार आहेत. त्यामुळे गर्दी वाढण्याची शक्यता आहे. तसेच तिस-या लाटेचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

  मुंबई : कोरोनाच्या दुस-या लाटेवर नियंत्रण आले असले तरी कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी तिस-या लाटेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर तिस-या लाटेला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आपली सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सर्व रुग्णालयात सद्या ३० हजार बेड्स उपलब्ध असून रुग्ण वाढल्यास एक लाखापर्यंत बेड्स वाढवण्याची तयारी पालिकेने केली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

  मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मागील दीड वर्षापासून कोरोनाशी लढा सुरु आहे. पहिल्या लाटेवर नियंत्रण आल्यानंतर फेब्रुवारीच्या मध्यावर कोरोनाची दुसरी लाट धडकली. या लाटेत ३३४ वर असलेली रुग्णसंख्या झपाट्याने वाढून दिवसाला ११ हजारावर पोहचली. वाढलेल्या रुग्णांमुळे पालिकेची आरोग्य सेवेवर ताण आला. रुग्णालयात ऑक्सिजन, वेंटिलेटरची कमी पडू लागल्याने रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्याची वेळ आली. मात्र कडक निर्बंधांमुळे तसेच राज्य व पालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनावर नियंत्रण आले.

  सद्या मुंबईतील रुग्णसंख्या तीनशेच्या खाली घसरली आहे. मृत रुग्णांची संख्याही एकेरी आकड़्यावर आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. सद्या उपलब्ध असलेल्या ३० हजार बेड्सपैकी फक्त ६०० बेड्स रुग्णांनी भरलेले आहेत. रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंधांत शिथिलता देण्यात आली आहे. शिवाय सणासुदीचे दिवसही आता सुरु होणार आहेत. त्यामुळे गर्दी वाढण्याची शक्यता आहे. तसेच तिस-या लाटेचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

  या पार्श्वभूमीवर पालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. रुग्णसंख्या वाढल्यास खाटांची संख्या कमी पडू नये यासाठी एक लाख खाटांची वाढवण्यासाठी पालिका कामाला लागली आहे. लसीकरणावरही भर दिला जात असून सध्या दिवसाला ५० हजार लशींचे डोस टोचले जात आहेत. पुरेसा लशीचा साठा उपलब्ध झाल्यास ही संख्या आणखी वाढेल असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

  दिवसाला दोन लाखापर्यंत लसीकरणाचे लक्ष्य

  कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने लसीकरणावर भर दिला आहे. सध्या दिवसाला ५० ते ८० हजारापर्यंत लसीकरण केले जाते. पुरेसा लस उपलब्ध झाल्यास ही संख्या दिवसाला दोन लाखापर्यंत करण्याचे लक्ष्य पालिकेचे असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

  एक लाख बेड उपलब्ध होणार

  दुस-या लाटेत रुग्णसंख्या झपाट्य़ाने वाढल्यानंतर खाटांची संख्या कमी पडली. त्यानंतर रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये खाटांची संख्या पालिकेने वाढवली. सध्या सर्व रुग्णालयात ३० हजार खाटा उपलब्ध आहेत. संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर खाटांची संख्या एक लाखांपर्यंत वाढवण्यासाठी पालिका कामाला लागली आहे. तिस-य़ा लाटेला रोखण्याठी खाटासंह वेंटिलेटर, ऑक्सिजन आदी यंत्रणा पालिकेने सज्ज ठेवली आहे.

  सध्या फक्त ६०० बेड्स रुग्णांनी व्यापलेले

  मुंबईत सध्या ३० हजार बेड्स उपलब्ध आहेत. यापैकी फक्त ६०० बेड्स रुग्णांनी व्यापलेले आहेत. यातील नेस्को १ कोविड सेंटरमध्ये दोन हजार बेड्स आहेत. येथे ४० बेड्स रुग्णांनी व्यापलेले आहेत. मुलुंड येथे १५०० बेड्स आहेत. येथे फक्त दोन रुग्ण बेड्सवर आहेत. असे ६०० बेड्स रुग्णांनी व्यापलेले आहेत. डिस्चार्जची संख्याही वाढली असल्याचे काकाणी यांनी सांगितले.