मुंबई महापालिकेची धडक कारवाई; तब्बल ६५ हजार जणांवर गुन्हा दाखल तर, २८ हजार ३५३ जणांना अटक

रात्रभर देखील ही कारवाई सुरू असते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आता गुन्हा दाखल केला जात आहे, त्यामुळे मुंबईकरांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

    मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत असल्यामुळे अनलॉक करण्यात आले. टप्प्याटप्प्याने अनलॉक झाले. असे असले तरी पालिका आणि पोलिसांकडून महामारी कायद्याच्या कलम १८८,२६९ अंतर्गत अद्यापही कारवाई सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ६५ हजार जणांवर या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

    रात्रभर देखील ही कारवाई सुरू असते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आता गुन्हा दाखल केला जात आहे, त्यामुळे मुंबईकरांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

    २० मार्च २०२० ते २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुंबई शहरात २८ हजार ७१५ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये दक्षिण मुंबईत सर्वाधिक ६६०२ जणांवर या कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. मध्य मुंबईत २८९१ जणांवर कारवाई झाली. तर पूर्व मुंबईत ३७५२ तसेच पश्चिम मुंबईत ३९६२ जणांवर कारवाई झाली. तसेच उत्तर मुंबईत १२ हजार ७०८ जणांवर या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

    मुंबई पालिका आणि पोलिसांच्या संयुक्तरित्या झालेल्या कारवाईदरम्यान कोरोना संदर्भात ३१७, हॉटेल्सला जास्तवेळ सुरू ठेवण्यासाठी ३२३, पान टपरी सुरू ठेवल्यास १३५, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यावरून १३,१७३, अवैध मालवाहतुकीवर ४०८८, मास्कचा वापर न केल्यामुळे १२,५९० प्रकरणांची नोंद करण्यात आली.

    देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सुमारे ६५ हजार प्रकरणे दाखल झाले आहेत. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत ८८७२ आरोपी फरार आहेत. तर २७ हजार ७७५ जणांना नोटीसा धाडण्यात आल्या आहेत. तसेच २८ हजार ३५३ जणांना अटक करून त्यांची जामीनावर सुटका झालेली आहे.