लशींसाठी मुंबई महापालिकेचे जगातील सहा शहरांच्या महापौरांना पत्र; लशींचा पुरवठा करण्याची मागणी

ग्लोबल टेंटरही मुंबई महापालिकेने काढले असून त्याबाबतची प्रक्रिया सुरु आहे. यासह मुंबई महापालिकेने लशींसाठी जगातील सेंट पिटर्सबर्ग, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, बुसान, स्टूटगार्ड आणि योकोहोमा या शहरातील महापौरांना पत्र पाठवली आहेत.

    मुंबई: राज्यात कोरोना प्रतिबंधक लशींचा तुटवडा असल्याने लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर लस मिळवण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रयत्न सुरु केला आहे. या पार्श्वभूमीवर जगातील ६ सिस्टर सिटीजने मुंबईला लस पुरवठा करावा, अशी मागणी मुंबई महापालिकेने केली आहे.

    कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाला वेग आणण्याच्यादृष्टीने मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी ग्लोबल टेंटरही मुंबई महापालिकेने काढले असून त्याबाबतची प्रक्रिया सुरु आहे. यासह मुंबई महापालिकेने लशींसाठी जगातील सेंट पिटर्सबर्ग, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, बुसान, स्टूटगार्ड आणि योकोहोमा या शहरातील महापौरांना पत्र पाठवली आहेत. सध्याच्या कठीण काळात मुंबईला कोविडशी लढण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे. तसेच या शहरांनी यशस्वीपणे कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे मुंबई शहराला मदतीचा हात द्यावा. तसेच उपलब्ध असतील त्या लसीचे १ कोटी ८० लाख डोस द्यावेत, असे मुंबई महापालिकेने पाठवलेल्य़ा पत्रात म्हटले आहे. येथील सहा ६ शहरांनी लसीच्या डोसची किंमत कळवून पुढील व्यवहार ठरवावा, असेही पालिकेने या पत्रात नमूद केले आहे. या ६ शहरांपैकी जपानमधील योकोहोमा या शहराने लस नाही, पण मुंबईसाठी आर्थिक मदत पाठवू, असे कळवले आहे.

    दरम्यान मुंबई महापालिकेने लशींसाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरला आठ पुरवठादार कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. मात्र त्यातील अस्ट्राझेनका फाईझर या पुरवठादार कंपनीने माघार घेतली आहे. या कंपनीने लशींचा पुरवठा करावा यासाठी मुंबई महापालिकेने चर्चा सुरु केली असल्याचे सांगण्यात आले.