मुंबईत आता १० टक्केच पाणीकपात; उद्यापासून निर्णयाची अंमलवजाबणी

मुंबईत लागू करण्यात आलेली २० टक्क्यांपैकी १० टक्के पाणीकपात करणार येणार असल्याची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

मुंबई : विहार, मोडकसागर, तानसा तलावही ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही तलावांतील जलसाठा ८५ टक्क्यांहून अधिक झाला आहे. यातच गणेशोत्सव आणि मोहरम जवळ येऊन ठेपला आहे. यामुळे मुंबईत लागू करण्यात आलेली २० टक्क्यांपैकी १० टक्के पाणीकपात करणार येणार असल्याची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

तुळशी, विहार, भातसा, मध्य वैतरणा, तानसा, मोडकसागर आणि अप्पर वैतरणा या तलावांतून मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येतो. जून आणि जुलैमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने या तलावांमधील पाणीसाठा आटला होता. सातही तलावांमध्ये ३१ जुलै रोजी एकूण ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. भविष्यात पावसाने दडी मारल्यास आणि तलावांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध होऊ शकला नाही तर या चिंतेत असलेल्या पालिकेच्या जलविभागाने खबरदारीचा उपाय म्हणून ५ ऑगस्टपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय ३१ जुलै रोजी घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागला.

सद्यस्थितीत एवढा आहे जलसाठा

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाने जोर धरला आहे. तलावांतील पाणीसाठ्यात वाढ झाली असून ते ८५.१४ टक्के भरले आहेत. आजमितीला तलावांमध्ये १२ लाख ३२ हजार ३०२ दशलक्ष लीटर इतके पाणी जमा झाले आहे.

का घेतला निर्णय?

मुंबईकरांना वर्षभर पुरेसा आणि सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी १ ऑक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर पाणीसाठा असणे आवश्यक आहे. तलावांमध्ये यापेक्षा कमी पाणीसाठा असल्यास मुंबईत पाणीकपात लागू करावी लागते.  २१ ऑगस्ट रोजी मोहरम आहे, तर २२ ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. उत्सवाच्या काळात मुंबईकरांना पुरेसे पाणी मिळावे यासाठी २१ ऑगस्टपासून २० पैकी १० टक्के  पाणीकपात मागे घेण्यात येत आहे.