मुंबई धोक्याच्या उंबरठ्यावर?’, आशिष शेलारांनी व्यक्त केली भीती

मुंबईची परिस्थिती चिंताजनक असून यावर एक तोडगा काढला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने नगरसेवक, आमदार, खासदार, पालिकेचे अधिकारी आणि या विषयातील तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून आढावा घ्यावा. नंतर हळहळ करण्यात अर्थ नाही, असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांना हे धोके कळले नाहीत. त्यांनी काल मुख्यमंत्र्यांना आढावा दिला आहे, असंही ते म्हणाले आहेत.

  मुंबई : मुंबईत सलग तीन दिवस पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचून, दरड कोसळून अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. भांडूप जलशुद्धीकरण केंद्रात पहिल्यांदाच पाणी शिरलं. समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर आला. गेली २५ वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे. या २५ वर्षात असं कधीच घडलं नव्हतं, असं सांगतानाच या घटना म्हणजे मुंबई धोक्याच्या उंबरठ्यावर तर नाही ना? हे मोठ्या संकटाचे संकेत तर नाही ना?, अशी भीती भाजपचे नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केली आहे.

  शेलार नेमकं काय म्हणाले?

  दोन दिवस मुंबईची स्थिती चिंताजनक आहे. मुंबई धोकादायक उंबरठ्यावर असल्याचंच दिसून येत आहे. मिठी नदी समुद्राकडे पाणी घेऊन जात असते. समुद्राला भरती आली तरच मिठी नदी भरते. काल पहिल्यांदा समुद्राला भरती नसताना मिठी नदीला पूर होता. लोकांच्या घरात पाणी गेलं. याचा अर्थ काय? भांडूपरच्या जलशुद्घीकरण केंद्रातही पाणी शिरलं. २६ जुलैच्या पावसातही भांडूप शुद्धीकरण केंद्रात पाणी शिरलं नव्हतं. हे धोकादायक आहे, असं शेलार म्हणाले आहेत.

  मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलवावी

  मुंबईची परिस्थिती चिंताजनक असून यावर एक तोडगा काढला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने नगरसेवक, आमदार, खासदार, पालिकेचे अधिकारी आणि या विषयातील तज्ज्ञांची तातडीने बैठक बोलावून आढावा घ्यावा. नंतर हळहळ करण्यात अर्थ नाही, असंही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यांना हे धोके कळले नाहीत. त्यांनी काल मुख्यमंत्र्यांना आढावा दिला आहे, असंही ते म्हणाले आहेत.

  पालिका नागरिकांचं ऐकत नाही

  महाविकासआघाडी आणि विरोधी पक्षांमध्ये सतत वादावादी सुरु असते. पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे काल बळी गेले. पालिकेने 112 टक्के नालेसफाईचा दावा केला होता. पण तरीही 31 लोक दगावले. त्याला जबाबदार कोण? ही नालेसफाई नाही. तर हात सफाई आहे. मिठी नदीबाबतही आम्हाला शंका आहे, असं ते म्हणाले. मुंबईतील धोकादायक भिंती, कट्टे, इमारती, डोंगराळ भाग याचं महिन्याभरापूर्वीच सर्वेक्षण करायला हवं होतं. पण पालिकेने हे सर्वेक्षण केलं नाही. पालिका नागरिकांचं ऐकत नाही. नगरसेवकांचं ऐकत नाही. त्यांना जनतेला मृत्यूच्या दारात आणून ठेवायचं आहे. सेनेच्या पालिकेने हे करून ठेवलंय, अशी टीकाही त्यांनी केली आहे.