बहुचर्चित रश्मी शुक्ला फोन टॅपींग प्रकरण; मुंबई पोलिसांचे सायबर सेल थेट CBI हेडची चौकशी करणार

मुंबई पोलीसांच्या सायबर शाखेने सीबीआयचे प्रमुख आणि राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना चौकशीचे समन्स बजावले आहे(Mumbai Police Cyber ​​Branch summons CBI chief and former state DGP Subodh Jaiswal ). सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नोटीस मध्ये जयस्वाल यांना १४ तारखेला रश्मी शुक्ला यांच्या बदल्यांच्या घोटाळा प्रकरणातील गोपनीय अहवाल फुटीच्या संदर्भात जबाब नोंदविण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. रश्मी शुक्ला यांनी मागील वर्षी संबंधीत गोपनीय अहवाल तत्कालिन पोलीस महासंचालक असलेल्या जयस्वाल यांना सादर केला होता.

  मुंबई :  मुंबई पोलीसांच्या सायबर शाखेने सीबीआयचे प्रमुख आणि राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना चौकशीचे समन्स बजावले आहे(Mumbai Police Cyber ​​Branch summons CBI chief and former state DGP Subodh Jaiswal ). सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या नोटीस मध्ये जयस्वाल यांना १४ तारखेला रश्मी शुक्ला यांच्या बदल्यांच्या घोटाळा प्रकरणातील गोपनीय अहवाल फुटीच्या संदर्भात जबाब नोंदविण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. रश्मी शुक्ला यांनी मागील वर्षी संबंधीत गोपनीय अहवाल तत्कालिन पोलीस महासंचालक असलेल्या जयस्वाल यांना सादर केला होता.

  रश्मी शुक्ला अहवाल प्रकरणी नोंदविणार जबाब

  तत्पूर्वी या प्रकरणात केंद्र सरकारच्या गृहविभागाकडून केल्या जात असलेल्या तपासात राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे आणि प्रभारी पोलीस प्रमुख संजय पांडे यांना नुकतेच सीबी आयने चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले होते. त्यानुसार शनिवारी या दोन्ही अधिका-यांचे अनिल देशमुख कथित वसुली प्रकरणी जबाब नोंदविण्यात आले.  त्यानंतर शुक्ला प्रकरणात तपास करत असलेल्या सायबर विभागाने जयस्वाल यांनाही जबाब नोंदविण्यासाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

  सूत्रांनी सांगितले की, शुक्ला यांच्या कथित फोन टँपिंग अहवालात राज्यातील काही नेत्यांसह दलालांचे संभाषण असून त्यात मोठ्या प्रमाणात बदल्यांचा घोटाळा झाल्याचा  निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र त्यावेळच्या पोलीस प्रमुखांनी कोणतीही कार्यवाही केली नव्हती.

  चौकशीला शुक्ला यानी न्यायालयात आव्हान

  त्यांनतर माजी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांचे लेटरबॉम्ब प्रकरण गाजले. त्यात सहायक पो. निरिक्षक वाजे याने बदल्यांसाठी पैसे घेतल्याबाबत जबाबात माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे.  रश्मी शुक्ला यांच्या त्या गोपनीय अहवालाबाबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यानी आरोप केले होते, त्यानंतर राज्य सरकारने शुक्ला यांच्यावर गोपनीय अहवाल फोडल्याप्रकरणी शिस्तभंग कारवाईचा बडगा उचलत चौकशी सुरू केली होती.

  या चौकशीला शुक्ला यानी न्यायालयात आव्हान देत आपल्याला बळीचा बकरा बनवले जात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर सायबर पोलीसांनी या प्रकरणी शुक्लांवर कारवाई सुरू केली होती. मात्र न्यायालयाने शुक्ला यांना संरक्षण दिले आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान या प्रकरणी आता सायबर विभागाने सीबीआय संचालकानाच समन्स बजावले आहे. त्यावर प्रतिक्रिया देण्यास सीबीआयने माध्यमांना नकार दिला.