मुंबईतील २०७ रस्त्यांची पावसाळा पूर्व कामे प्रगतीपथावर

मुंबई: बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या पाठोपाठ इतरही पावसाळापूर्व कामांनी आता वेग घेतला आहे. यामध्ये सध्या प्रगतीपथावर असलेल्या २०७ रस्त्यांच्या कामांचाही समावेश आहे. यापैकी ९५

मुंबई:  बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या पाठोपाठ इतरही पावसाळापूर्व कामांनी आता वेग घेतला आहे. यामध्ये सध्या प्रगतीपथावर असलेल्या २०७ रस्त्यांच्या कामांचाही समावेश आहे. यापैकी ९५ रस्त्यांची कामे ही पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. ही कामे करताना अधिकाधिक यांत्रिक पद्धतीने करावीत; तसेच सदर ठिकाणी काम करत असलेले कामगार – कर्मचारी – अधिकारी यांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’ काटेकोरपणे पाळावे आणि योग्यप्रकारे मुखावरणे वापरावीत; असे निर्देश महापालिका प्रशासनाने  यापूर्वीच सर्व संबंधितांना दिले आहेत.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्ती व बांधकाम कामे हाती घेतली जातात. यावर्षीदेखील महापालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी ही कामे हाती घेण्यात आली आहेत. तथापि, ‘कोरोना कोविड १९’ च्या पार्श्वभूमीवर ‘कंटेनमेंट झोन’ परिसरातील रस्ते कामांबाबत प्रकरण परत्वे निर्णय घेतला जात आहे. सध्या एकूण २०७ ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामध्ये ३५ कामे शहर भागातील असून ४६ कामे ही पूर्व उपनगरांमधील आहेत. तर पश्चिम उपनगरांमधील १२६ कामे प्रगतिपथावर आहेत. प्रगतीपथावर असलेल्या या कामांमध्ये अंधेरी घाटकोपर लिंक रोड, ‘जी दक्षिण’ विभागातील शंकरराव नरम मार्ग, घाटकोपर मानखुर्द लिंक रोड, वांद्रे पूर्व परिसरातील हरिमंदिर मार्ग या रस्त्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. एकूण २०७ कामांपैकी ९५ ठिकाणची कामे ही पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, अशा पद्धतीने वेळापत्रकानुसार करण्यात येत आहेत. या ९५ कामांमध्ये शहर भागातील ३३, पूर्व उपनगर भागातील २४ आणि पश्चिम उपनगर भागातील ३८ कामांचा समावेश आहे. त्याचबरोबर यापूर्वी सुरु असलेल्या कामांसह नव्याने हाती घेतलेल्या कामांपैकी एकूण २७९ रस्त्यांची कामे ही पावसाळ्यापूर्वी अधिकाधिक प्रमाणात पूर्ण करुन सदर रस्त्यांची कामे ‘मोटरेबल’ टप्प्यापर्यंत करण्यात येणार आहेत. जेणेकरून पावसाळ्यादरम्यान वाहतुकीसाठी या रस्त्यांचा वापर करता येईल. तर या रस्ते कामांचे उर्वरित टप्पे हे पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही कामे करत असताना आवश्यक ती सर्व प्रतिबंधात्मक काळजी घेण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने यांत्रिक पद्धतीने कामे करण्यास प्राधान्य दिले जात असून त्यात मानवी हस्तक्षेप कमीत कमी असेल याकडे काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे. त्याचबरोबर यापूर्वी देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सर्व संबंधित व्यक्तींनी व कामाच्या ठिकाणी असणाऱ्या कामगार -कर्मचारी – अधिकाऱ्यांद्वारे ‘सोशल- डिस्टन्सिंग’ काटेकोरपणे पाळण्यात येत आहे. तसेच मुखावरणे (मास्क) देखील नियमितपणे वापरण्यात येत आहेत. कंत्राटदारांनीही त्यांच्या मनुष्यबळाकडून रस्ते विषयक कामे करवून घेताना, या बाबींचे काटेकोरपणे पालन करत असल्याची खातरजमा नियमितपणे व वेळोवेळी करून घ्यावी, असेही निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत.
बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाची ‘कोरोना या आजाराशी एकीकडे दिवस-रात्र लढाई सुरू असतानाच दुसरीकडे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील इतर आवश्यक कामे देखील निर्धारित वेळापत्रकानुसार पूर्ण होतील याकडे बृहन्मुंबई महापालिका प्रशासन कटाक्षाने लक्ष देत आहे. यादृष्टीने महापालिकेच्या स्तरावर पावसाळापूर्व कामांचे  सुव्यवस्थित नियोजन करण्यात आले असून नियोजनाच्या अंमलबजावणीचा आढावा देखील सातत्याने घेतला जात आहे.