Mumbai RTO's abandoned idea; Attempt to issue learning licenses to as many college students as possible

राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी मुंबई आणि उपनगरातील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना याबाबत प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आता स्थानिक आरटीओंना संबंधित विभागातील विद्यापीठ किंवा महाविद्यालयांच्या प्रतिनिधींना संपर्क साधावा लागणार आहे. त्यानंतर अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांना शिकाऊ परवाना (लर्निंग लायसन्स) मिळवता येणार आहे.

    मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना गाडी चालवण्याचा परवाना काढण्याबाबत प्रोत्साहित करण्यासाठी आणि महाविद्यालयातील जागेचा वापर करण्यासाठी परिवहन विभागाने महाविद्यालयात पोहचण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी स्थानिक पातळीवर प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयांना पुढाकार घेण्याचे आदेश दिले आहेत.

    राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी मुंबई आणि उपनगरातील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना याबाबत प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आता स्थानिक आरटीओंना संबंधित विभागातील विद्यापीठ किंवा महाविद्यालयांच्या प्रतिनिधींना संपर्क साधावा लागणार आहे. त्यानंतर अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांना शिकाऊ परवाना (लर्निंग लायसन्स) मिळवता येणार आहे.

    परवाना काढण्याची प्रक्रिया ऑनलाईन करून प्रशासनाने भ्रष्टाचाराचे बहुतांश मार्ग बंद केले आहेत. त्यापुढे जाऊन अधिकाधिक तरुणांना परवाना काढण्याची प्रक्रिया समजावी म्हणून आता महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना आरटीओतील अधिकारी व कर्मचारी परवाना काढण्याचे प्रशिक्षण देतील. त्यासाठी इच्छुक महाविद्यालय किंवा विद्यापीठाला स्थानिक आरटीओसोबत संपर्क साधावा लागेल. परिवहन विभागाचे कर्मचारी व अधिकारी विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करण्यात मदत करतील. सोबतच प्रशिक्षणही देतील, अशी माहिती परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली.

    महत्वाची बाब म्हणजे, वाहन चालकाला परवान्यासाठी मदत करण्याची इच्छा परिवहन विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, त्यासाठी संबंधित महाविद्यालयाकडे पुरेशी जागा उपलब्ध आहे का, याची पाहणी करावी लागणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आवश्यक वाहन चालवण्याचा ट्रॅक महाविद्यालय परिसरात उभारणे शक्य असेल, तर नक्की हा प्रयोग केला जाईल, असेही परिवहन विभागाकडून सांगण्यात आले.

    परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि उपनगरातील आरटीओ कार्यालयांत जागेची कमतरता आहे. त्यामुळे, मुंबई आणि उपनगरातील आरटीओ कार्यालयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जर शनिवार आणि रविवार हे दोन दिवस महाविद्यालय आणि विद्यापीठांची जागा आम्हाला वाहनांची टेस्टिंग करण्यासाठी मिळाली तर अनेक अडचणी सुटणार आहे. सध्या आम्ही मुंबईतील महाविद्यालयांशी संपर्क साधणार आहोत. जर ही योजना मुंबईत यशस्वी ठरली तर राज्यात इतरही जिल्ह्यात अशी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेमुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनासुद्धा मोठा फायदा होणार आहे.