मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय,स्वप्ना पाटकर यांचा जामीन अर्ज फेटाळला

बोगस डीग्रीच्या प्रकरणात(Bogus Degree Case) अटक करण्यात आलेल्या मराठी चित्रपट निर्मात्या आणि मानसोपचार तज्ज्ञ स्वप्ना पाटकर(Swpna patkar) यांनी दाखल केलेला जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने(Mumbai Session Court) फेटाळून लावला.

    मुंबई :शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यावर आरोप करणाऱ्या आणि बोगस डीग्रीच्या प्रकरणात(Bogus Degree Case) अटक करण्यात आलेल्या मराठी चित्रपट निर्मात्या आणि मानसोपचार तज्ज्ञ स्वप्ना पाटकर(Swpna patkar) यांनी दाखल केलेला जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने(Mumbai Session Court) फेटाळून लावला.

    साल २०१३ आणि २०१८ मध्ये कलिना येथे राहणाऱ्या डॉ. स्वप्ना पाटकर आणि त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात पाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यातच पाटकर या बोगस डिग्रीचा वापर करून मागील दोन वर्षांपासून सिटी रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञाची प्रॅक्टिस करत असलयाचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि ८ जून रोजी बोगस डिग्री प्रकरणात पाटकर यांना वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्याविरोधात त्यांना मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्या. एम. एम. उमर यांच्यासमोर सुनावणी पार पडली.

    पाटकर यांना खोट्या प्रकरणात गुंतविण्यात आले असल्याचा दावा त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला. त्यामुळे त्यांना कारागृहात न ठेवता जामीन देण्यात यावा, अशी विनंतीही त्यांनी केली. सदर प्रकरणात अद्याप चौकशी आणि तपास प्राथमिक टप्प्यात सुरू आहे. यावेळी त्यांना जामीन दिल्यास पुराव्यांशी अथवा साक्षींदाराशी छेडछाड केली जाऊ शकते, असा दावा करत पोलिसांकडून जामीन अर्जाला विरोध करण्यात आला.

    दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत प्रथमदर्शनी अर्जदारांविरोधात पुरावे उपलब्ध असून त्यांनी अजामीनपात्र गुन्हा केला असल्यावर विश्वास ठेवण्यास ते पुरेसे आहेत. दुसरीकडे पोलिसांचा तपास सुरू आहे त्यामुळे सत्यता आणि परिस्थिती पाहता अर्जदारांना जामीन दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पाटकर यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.