पूर्व उपनगरातील नालेसफाईचे ६० टक्के काम पूर्ण –  स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी नालेसफाई पाहणीनंतर दिली माहिती

मुंबई: पूर्व उपनगरातील नालेसफाईचे काम समाधानकारक सुरू असून आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष

मुंबई: पूर्व उपनगरातील नालेसफाईचे काम समाधानकारक सुरू असून आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी आवश्यक ती रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना दिले. पूर्व उपनगरातील नालेसफाई व रस्त्यांच्या कामाची स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अतिरिक्त महापालिका आयुक्त ( प्रकल्प)  पी. वेलारासू यांच्यासमवेत आज पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव पुढे म्हणाले की, नालेसफाई  व रस्ते  पाहणीचा हा दुसरा दौरा असून कामे व्यवस्थितरित्या व्हावी यासाठी ही पाहणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. नालेसफाई व रस्त्यांची कामे २४ तासही गतीने पूर्ण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील जंक्शनची कामे गतीने पूर्ण करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. या पाहणी दौऱ्याला कुर्ला (पश्चिम) च्या एलबीएस मार्गावरील शीतल सिनेमा येथून प्रारंभ झाला. एलबीएस  मार्गावर पाणी भरणाऱ्या ठिकाणांची व याठिकाणी करण्यात आलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. यामध्ये शितल सिनेमा, संजय नगर पोलीस चौकी, कुर्ला (पश्चिम), महेंद्र पार्क जंक्शन, घाटकोपर,  साईसृष्टी बिल्डिंगजवळील  आंबेवाडी जंक्शन, चेंबूरमधील आर. सी. मार्ग, इंदिरानगर   याठिकाणची पाहणी करण्यात आली. काही ठिकाणी छोटे कलव्हट तयार करून पाणी वाहून  येणाऱ्या मुख्य पर्जन्य जलवाहिनीला जोडण्यात आली आहेत. यामुळे पावसाचे पाणी तुंबून न राहता  या पाण्याचा निचरा होण्यास मोठा हातभार लागणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी  स्थायी समिती अध्यक्षांना यावेळी सांगितले.
सायन स्टेशन ते चेकनाकापर्यंत संपूर्ण २१ किलोमीटरच्या एलबीएस मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत असून विविध विभागांतर्गत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची सुद्धा स्थायी समिती अध्यक्षांनी यावेळी पाहणी केली.  या मार्गावर येणारी अतिक्रमणे काढून हा मार्ग रुंदीकरण करण्यात येत आहे. शंभर फुटाच्या या मार्गावर पदपथाची कामे चांगले रीतीने पूर्ण करून  हा रस्ता गतीने पूर्ण करण्याची सूचना स्थायी समिती अध्यक्षांनी रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.
 यानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पूर्व द्रुतगती महामार्गावरील लक्ष्मीबाग नाल्याची पाहणी केली. या नाल्यामधून आतापर्यंत किती  गाळ काढण्यात आला आहे याची माहिती घेऊन उर्वरित काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची सूचना केली. त्याचबरोबर मानखुर्दमधील सुभाष नगर नाल्याची पाहणी केली. हा नाला खाडीला जाऊन मिळत असल्यामुळे भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये तरंगता कचरा वाहून येत असल्याचे नगरसेवक  परमेश्वर कदम यांनी सांगितले. याबाबत खाडीच्या मुखाशी संरक्षक जाळी  बसवावी, जेणेकरून हा कचरा नाल्यामध्ये वाहून येणार नाही, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी यावेळी पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
 यानंतर स्थायी समिती अध्यक्षांनी २.१ किलोमीटरच्या घाटकोपर – मानखुर्द लिंक रोड उड्डाण पुलाच्या कामाची पाहणी केली. तीन लेन असलेला उड्डाणपूल बृहन्मुंबई महानगरपालिका प्रथमच बांधत असून २०२१ पर्यंत या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्थायी समिती अध्यक्षांना यावेळी सांगितले. यानंतर  स्थायी समिती अध्यक्षांनी धामा चौकी ते सुमन नगर रस्त्याच्या कामाची पाहणी केली. या ठिकाणी सुद्धा अतिक्रमण काढून नव्याने १.४ किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात येत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्थायी समिती अध्यक्षांना सांगितले. यानंतर स्थायी समिती अध्यक्षांनी चेंबूरच्या इस्लामपुरा  येथील मुकुंदनगर  नाल्याची पाहणी केली. नाल्याची साफसफाई तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या पाहणी दौऱ्याला स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) उपेंद्र सावंत, नगरसेवक  परमेश्वर कदम, सुरेश पाटील, उप आयुक्त (पायाभूत सुविधा कक्ष) संजय दराडे, प्रमुख अभियंता (पजवा) संजय जाधव उपस्थित होते.