प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

तृतीय वर्ष बीकॉम(Third Year Bcom) सत्र ६ या परीक्षेसाठी ६८ हजार २९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६७ हजार ९७४ एवढे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ३२२ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते.

    मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या(Mumbai University) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या अंतिम वर्षाच्या एप्रिल-मे २०२१ मध्ये झालेल्या उन्हाळी सत्राच्या वाणिज्य शाखेचा महत्वपूर्ण असा तृतीय वर्ष बीकॉम(Third Year BCom Result Declared) सत्र ६ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल ९४.५४ टक्के लागला आहे. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.

    तृतीय वर्ष बीकॉम सत्र ६ या परीक्षेसाठी ६८ हजार २९६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६७ हजार ९७४ एवढे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर ३२२ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ४९ हजार ७९६ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले तर या परीक्षेत २८७८ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी म्हणजे वर्ष २०२० चा निकाल नोव्हेंबर २०२० मध्ये जाहीर करण्यात आला होता. हा निकाल ९५.७९ टक्के एवढा लागला होता. परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. २०२१ च्या उन्हाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने ६५ निकाल जाहीर केले आहेत. विद्यापीठाने मंगळवारी दिवसभरात १० परीक्षांचे निकाल जाहीर केले. तृतीय वर्ष बीएच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आले असून तो निकाल लवकरच जाहीर केला जाईल. तसेच इतरही निकाल वेळेत जाहीर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. हा निकाल जाहीर करण्यासाठी परीक्षा विभागातील निकाल व संगणक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत होते.

    कोरोनाची साथ असताना मुंबई विद्यापीठाने सर्व नियमित आणि बॅकलॉग परीक्षांच्या निकालास सर्वोच्च प्राधान्य देऊन वेळेत निकाल जाहीर करण्यासाठी यशस्वी नियोजन केले आहे. महाविद्यालयांनी ऑनलाईन परीक्षा घेऊन पोर्टलवर गुण उपलब्ध करून दिल्यामुळे, विद्यापीठाने हे निकाल वेळेत जाहीर केले असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.