मुंबईला पावसाने झोडपले,  मालाड आणि कुर्ला भागात दरड कोसळली ; १ जखमी

आज दिवसभर आभाळ काळवंडले होते. गेले आठवडाभर वातावरण असेच आहे. शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. मात्र आज पावसाचा जोर वाढल्याचे आज दिसून आले.

    मुंबई – मुंबई शहर तसेच उपनगरात आज पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. दुपारनंतर संतधार कायम होती. घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांची पावसाने दैना उडाली. कुर्ला आणि मालाड या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या मात्र त्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही, त्यात एक जण जखमी असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिली. येत्या चोवीस तासात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.

    आज दिवसभर आभाळ काळवंडले होते. गेले आठवडाभर वातावरण असेच आहे. शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या सरी पडत आहेत. मात्र आज पावसाचा जोर वाढल्याचे आज दिसून आले.

    मालाडच्या पूर्वेस असलेल्या कुरार व्हिलेज येथील आंबेडकर नगरात दरड कोसळल्याने येथील सुमारे १०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सकाळी पावणे अकराच्या सुमारास सकिनाका कुर्ला या ठिकाणी दरडींचा काही भाग कोसळला त्यात एकजण जखमी झाला असून जखमीला राजावाडी रुगणालयात उपचार करून सोडून देण्यात आले.

    गेल्या चोवीस तासांच शहर येथे ४६.४२ मि. मी., पूर्व उपनगरे ३३.०२ व पश्चिम उपनगरे येथे ३९.२४ मि.मी. इतक्या पावसाची पालिकेच्या पर्जन्यमापक केंद्रावर नोंद झाली. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत काही भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच मुंबई शहर आणि उपनगरात काही भागांत मध्यम तर काही भागात जोरदार आणि अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.