४ दिवसांच्या दमदार पावसामुळं धरणातील पाणी साठ्यात वाढ

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ८७.८६ टक्के पाणीसाठा जमा होता. त्याआधी ऑगस्टच्या महिन्याच्या सुरुवातीपासून तलावक्षेत्रात तुरळक पाऊस पडत असल्याने पाणीपातळी संथगतीने वाढत होती. परंतु आता मागील चार दिवसात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत आता मुंबईकरांना वर्षभर पाणी पुरेल म्हणजे  ८९ ते ९० टक्के इतका पाणीसाठा जमा आहे.

    मुंबई :  महाराष्ट्रासह मुंबईत मागील चार दिवसांपासून वरुणराजाने हजेरी लावल्यामुळं आणि मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडल्यामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये पाण्याचा साठा समाधानकारक असल्याचे बोलले जातेय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ८७.८६ टक्के पाणीसाठा जमा होता. त्याआधी ऑगस्टच्या महिन्याच्या सुरुवातीपासून तलावक्षेत्रात तुरळक पाऊस पडत असल्याने पाणीपातळी संथगतीने वाढत होती. परंतु आता मागील चार दिवसात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत आता मुंबईकरांना वर्षभर पाणी पुरेल म्हणजे  ८९.८६ ते ९० टक्के इतका पाणीसाठा जमा आहे.

    मुंबईत गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा कमी असल्याने तलावक्षेत्राला पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे. मुंबईत २०१९ आणि २०२० साली पाऊस चांगला पडल्यामुळं तलावक्षेत्रात पाणीसाठा बऱ्यापैकी होता. परंतु यावर्षी जून आणि जुलैमध्ये मुसळधार पाऊस पडला. पण या दोन महिन्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये पावसाची सरासरी खूपच कमी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं मुंबईतील धरणक्षेत्रात पाणीसाठी ऑगस्टपर्यंत कमी होता, त्यामुळे स्वाभाविकपणे मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट येते की काय? अशी भीती व्यक्त केली जात होती. परंतू आता धरणक्षेत्रात समाधानकारक पाणीसाठा असल्याने मुंबईकरांवर कोणतेही पाणी कपातीचे संकट येणार नाही अशी सुत्रांची माहिती आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात १७ जुलै २०२१ पर्यंत अगदीच कमी पाऊस पडला होता. त्यामुळे पाणीकपात करावी लागते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे तलावांतील जलसाठय़ात मोठी वाढ झाली. मागील महिन्याभरापासून तलाव क्षेत्रात तुरळक पाऊस पडत आहे. तसेच अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत १२ लाख ५७ हजार २५१ दशलक्ष लिटर म्हणजे ८७.८६ टक्के पाणीसाठा जमा झाला होता.

    २०१९ मध्ये ऑगस्टअखेर ९५ टक्के पाणीसाठा होता. तर २०२० मध्ये ऑगस्ट अखेर ९२ टक्के पाणासाठा होता. त्यामुळे पाणी कपातीचे संकट टळले होते. वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात तलावांतून मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करावा लागतो. सातही तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असतात, तेव्हा एकूण पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर असतो. मागील वर्षी पाच ते दहा टक्के पाणी कपात करण्यात आली होती. परंतु या वर्षी अजूनही धऱणक्षेत्रात पाण्याची गरज आहे, म्हणावा तसा पाणीसाठा नाहीय. त्यामुळे मागील चार दिवसांपासून पडलेल्या पावसामुळं थोडासा दिलासा मिळाला असून, पाणी कपातीचे संकट तूर्त तरी टळले असे म्हणणे धाडसाचे होईल, जर सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारली तर, पाणी कपातीचे संकट येऊ शकते. पण कालच प्रादेशिक हवामान विभाग, मुबंई यांनी या महिन्यात देशभरात चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे या महिन्यात तुरळक किंवा मध्यम स्वरुपाचा पाऊस जरी पडला तरी, मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट टळेल असं म्हणता येईल.