Mumbai woman cheated on Amazon

मुंबई : सध्या अनेकांनाच ऑनलाइन शॉपिंगचे वेड लागले आहे. मात्र, ऑनलाइन शॉपिंग करताना योग्य खबरदारी न घेतल्यास तुमची फसवणुक होऊ शकते. मुंबईतील अशीच एक ‘लकी ग्राहक’ फसवणुकीमुळे अनलकी ठरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ॲमेझॉन शॉपिंगचे ‘लकी ग्राहक’ ठरल्याने महागडे गिफ्ट मिळणार असल्याचा कॉल मलबार हिल येथे राहणाऱ्या एका महिलेला आला. याच महागड्या गिफ्टसाठी या महिलेला ९५ हजारांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी मलबार हिल पोलीस अधिक तपास करीत आहेत.

गेल्या महिन्यात २४ तारखेला तक्रारदार महिलेला एका अनोळखी नंबरवरून कॉल आले. यात, कॉलधारकाने तो ॲमेझॉन ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटमधून बोलत असल्याचे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला. पुढे कंपनीचे ‘लकी ग्राहक’ ठरल्याने ‘बक्षीस’ मिळणार असल्याचे सांगितले. यानंतर बक्षिसासाठीच्या विविध शुल्कांच्या नावाखाली या महिलेकडून ९५ हजार रुपये उकळले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली.

मागील काही दिवसांत लकी ड्रॉ, कौन बनेगा करोडपती लॉटरी तसेच विविध भेटवस्तू देण्याच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.